

लंडन : हसणे ही आपल्याला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. हसण्याने मनावरील ताण दूर होतो आणि शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते हे आपल्याला माहिती आहेच. हल्ली तर हास्य क्लब, हास्य योग व हास्य थेरेपीही पाहायला मिळत असतात. ‘हसताय ना... हसायलाच पाहिजे...’ हा डायलॉग आपण सतत कॉमेडी शो च्या माध्यमातूनही टीव्हीवर ऐकत असतो, पण हे खरंच आहे. आता एका नव्या संशोधनात आढळले आहे की हसण्याचा लाभ डोळ्यांनाही होतो. हसण्यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्याही दूर होण्यास मदत होते असे दिसून आले आहे.
शास्त्रज्ञांनी कोरड्या डोळ्यांच्या समस्येवर हा एक नैसर्गिक आणि मस्त उपाय शोधला आहे. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरड्या डोळ्यांची समस्या मोठ्याने हसल्याने बरे होऊ शकते. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. याचा अर्थ कोरड्या डोळ्यांसाठी महागडे आयड्रॉप्सच्या ऐवजी हास्य थेरपी हे सर्वोत्तम औषध ठरू शकते. लंडनमधील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगातील सुमारे 36 कोटी लोक ड्राय आय सिंड्रोमने ग्रस्त आहेत, त्यामुळे हे संशोधन करावे लागले. एकट्या ब्रिटनमध्ये सातपैकी एका व्यक्तीला डोळ्यांच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्यांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे आणि लाल होणे यांचा समावेश होतो. संशोधकांच्या मते, जे लोक सतत आयड्रॉप्स वापरतात, त्यांच्यासाठी हसणे हा एक नवीन उपाय आहे. यामुळे महागड्या उपचारांपासून परवडत नसलेल्या लोकांना दिलासा मिळेल. शास्त्रज्ञांनीही ही पद्धत एक उत्तम पर्याय मानली आहे. संशोधनासाठी वैज्ञानिकांनी दोन गट तयार केले होते, या गटांमध्ये चीन आणि ब्रिटनमधील लोकांचा समावेश होता. अभ्यासासाठी, एका गटात फक्त हसायला लावणारे व्यायाम केले गेले. तर दुसर्या गटावर डोळ्यातील औषधाचे थेंब टाकून उपचार करण्यात आले. दिवसातून चार वेळा या लोकांच्या डोळ्यात आय ड्रॉप्स टाकण्यात आले. हास्य गटात दिवसातून चार वेळा पाच मिनिटे हसायला लावले. हा सराव सलग आठ आठवडे चालू ठेवला गेला आणि नंतर निकाल लागला, ज्यामध्ये हास्य थेरपी अधिक यशस्वी झाली!