

नवी दिल्ली : दीर्घायुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे कितीही फायदेशीर असले, तरी ते कायम पाळणे अवघड असते. यावर उपाय शोधणार्या शास्त्रज्ञांनी सी. एलिगन्स (एक छोटासा जंतू) या मॉडेल जीवावर संशोधन केले आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, स्पर्श आणि वास यांसारख्या संवेदी अनुभवांमुळे दीर्घायुष्य वाढवणारे परिणाम नष्ट होऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या संशोधनातून हे उघड झाले आहे की, आपले मेंदू, चयापचय (मेटोबॉलिझम) आणि बाह्य वातावरण हे दीर्घायुष्याशी किती खोलवर जोडलेले आहेत.
एफएमओ-2 जनुक आणि संवेदी हस्तक्षेप (सेन्सरी इंटरफेअरन्स) याबाबत संशोधन करताना संशोधकांना आढळले की, एफएमओ-2 नावाचे एक महत्त्वाचे जनुक (जीन) आहे. आहार प्रतिबंध (कमी खाणे) केल्यास आतड्यांमधीलएफएमओ-2 या जनुकाच्या क्रियाशीलतेत वाढ होते, ज्यामुळे चयापचय सुधारते आणि दीर्घायुष्य वाढते. जेव्हा जंतूंना त्यांच्या नेहमीच्या खाद्यासारख्या गोळ्यांवर ठेवले गेले, तेव्हा या कोमल स्पर्शाने त्यांच्या शरीरात एक विशिष्ट न्यूरल सर्किट सक्रिय झाले.
या न्यूरल सर्किटमुळेएफएमओ-2 जनुकाची क्रियाशीलता दाबली गेली आणि आहार प्रतिबंधाचे दीर्घायुष्य वाढवणारे फायदे कमी झाले. स्पर्शाच्या या अनुभवाने डोपामाइन आणि टायरामाइन सोडणार्या पेशींमधून येणारे सिग्नल बदलले, ज्यामुळे एफएमओ-2 चे सक्रिय होणे थांबले. संशोधकांनी एफएमओ-2 च्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आणखी एक प्रयोग केला: ज्या जंतूंमध्ये एफएमओ-2 जनुक जास्त प्रमाणात सक्रिय केले गेले, ते धोक्याच्या वेळी मागे हटले नाहीत किंवा उपवासानंतर अन्न खाण्यासाठी थांबले नाहीत. ते त्यांच्या सभोवतालच्या सकारात्मक किंवा नकारात्मक बदलांवर उदासीन राहिले.
दीर्घायुष्य वाढवणार्या कोणत्याही हस्तक्षेपाचे वर्तणुकीवर काहीतरी दुष्परिणाम नक्कीच होत असतील. हे बदल ट्रिप्टोफॅन चयापचयामुळे होत असल्याचे दिसून आले. या संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ असा आहे की, जर शास्त्रज्ञ एफएमओ-2 जनुकाला आहार कमी न करता सक्रिय करू शकले, तर मेंदूला स्ट्रेस रिस्पॉन्स सक्रिय करण्याची फसवणूक करता येईल आणि मानवाचे दीर्घायुष्य वाढवता येईल. सी. एलिगन्स मधील एफएमओ-2 जनुकाचे मानवी समकक्ष एफएमओ-2 असते. बहुतांश मानवांमध्ये एफएमओ-2 जनुक अक्रियाशील असते. भविष्यात एफएमओ-2 जनुकाच्या कार्यावर आणि त्याचे चयापचय आणि वर्तणूक यांच्याशी असलेल्या संबंधांवर संशोधन करून औषधे विकसित केली जाऊ शकतात, ज्यामुळे टोकाचा आहार न घेता दीर्घायुष्य वाढवणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.