Healthy Lifestyle Change | दीर्घायुष्यासाठी ‘हा’ लहान बदलही ठरतो उपयुक्त

Healthy Lifestyle Change
Healthy Lifestyle Change | दीर्घायुष्यासाठी ‘हा’ लहान बदलही ठरतो उपयुक्तFile Photo
Published on
Updated on

लंडन : दीर्घायुष्य मिळवण्यासाठी जिममध्ये तासन्तास घाम गाळण्याची किंवा आहारात मोठे बदल करण्याची गरज नाही. केवळ व्यायामात दोन मिनिटांची वाढ आणि झोपेत पाच मिनिटांची भर घातल्यास आरोग्यावर कमालीचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि तुमचे आयुष्य वाढू शकते, असे ब्रिटनमधील एका मोठ्या संशोधनातून समोर आले आहे.

‘eClinicalMedicine’ या नियतकालिकात 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या संशोधनासाठी ‘यूके बायोबँक’मधील सुमारे 60,000 लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी जीवनातील अशा लहानात लहान बदलांचा शोध घेतला, ज्यामुळे मानवी आयुर्मान मोजता येण्याजोग्या प्रमाणात वाढू शकते. या अभ्यासातील सांख्यिकीय प्रारूपांनुसार, पुढील तीन लहान बदलांमुळे आयुर्मानात एक वर्षाची वाढ होऊ शकते:

व्यायाम : दिवसातून फक्त 2 मिनिटे अतिरिक्त मध्यम ते तीव्र स्वरूपाचा शारीरिक व्यायाम करणे.

झोप : दररोज केवळ 5 मिनिटे अतिरिक्त झोप घेणे.

आहार : दररोजच्या जेवणात अर्धा भाग भाज्यांचे प्रमाण वाढवणे. संशोधनानुसार, ज्या लोकांच्या सवयी सर्वात वाईट (तळाच्या 5 टक्क्यांत) होत्या, त्यांच्या तुलनेत वरील बदल करणार्‍या लोकांचे आयुर्मान लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळले.

सिडनी विद्यापीठातील आहारतज्ज्ञ आणि प्रमुख संशोधक निकोलस कोमेल यांच्या मते, जीवनातील विविध पैलूंमध्ये केलेले छोटे सुधार हे त्यांच्या स्वतंत्र परिणामांपेक्षा एकत्रितपणे अधिक प्रभावी ठरतात.

उदाहरणार्थ : केवळ झोपेतून एक वर्षाचे अतिरिक्त आयुष्य मिळवायचे असेल, तर व्यक्तीला दररोज 25 मिनिटे जास्त झोपावे लागेल, जे अनेकांसाठी शक्य नसते. परंतु, जेव्हा आपण झोप, आहार आणि व्यायाम या तिन्हींमध्ये अगदी किरकोळ सुधारणा करतो, तेव्हा त्यांचा एकत्रित परिणाम मोठा असतो. केंब्रिज विद्यापीठातील सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीफन बर्जेस यांनी स्पष्ट केले की, हे संशोधन थेट ‘हमी’ देत नाही. ‘हा अभ्यास या सवयी आरोग्यात सुधारणा करतात हे सिद्ध करण्यापेक्षा, जर आपण या सवयी बदलल्या, तर आपल्या आयुर्मानावर काय परिणाम होऊ शकतो, याचे एक प्रारूप मांडतो,’ असे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news