

वॉशिंग्टन : अलीकडेच समोर आलेल्या एका नव्या अभ्यासात ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या बदलांबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप आणि हबल टेलिस्कोपने दिलेल्या प्रतिमांवरून असा संकेत मिळतो की ब्रह्मांडाच्या ‘पुनःआयनिकरण कालखंडा’साठी जबाबदार घटक विशाल कृष्णविवर किंवा मोठ्या आकाशगंगा नव्हे, तर लघू आकाशगंगा (Dwarf Galaxies) आहेत, ज्या लहान असल्या तरी अत्यंत शक्तिशाली ठरल्या. याचा अर्थ ब्रह्मांडाच्या उत्पत्ती व विकासाच्या प्रक्रियेत अशा छोट्या आकाशगंगाच अधिक महत्त्वाचे योगदान देतात.
जगभरातील खगोलशास्त्रज्ञ गेल्या कित्येक दशकांपासून याचा शोध घेत आहेत की थंड, अंधार्या आणि दाट हायड्रोजन धुक्याने व्यापलेल्या प्रारंभिक ब्रह्मांडाचे रूपांतर तार्यांनी आणि आकाशगंगा समूहांनी भरलेल्या ब्रह्मांडात कसे झाले. या संक्रमणकाळाला कॉस्मिक रीऑनायझेशन (Cosmic Reionization) असे म्हणतात, ज्या कालखंडात ब्रह्मांड अधिक पारदर्शक बनले आणि प्रकाशाला मुक्त प्रवास करता आला.
शोधकर्त्यांनी गॅलक्सी क्लस्टर ‘Abell 2744’ मधील ग्रॅव्हिटेशनल लेंसिंग तंत्राचा वापर करून ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळाकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असे आढळले की लघू आकाशगंगा या प्रक्रियेत अग्रभागी होत्या. या लघू आकाशगंगा केवळ संख्येनेच अधिक नव्हत्या, तर त्या आयनायझिंग रेडिएशन तयार करण्यातही अतिशय कुशल होत्या. या शक्तिशाली रेडिएशनमुळे ब्रह्मांडातील दाट हायड्रोजन कोहरा नष्ट झाला आणि प्रकाश मुक्तपणे फिरू लागला. इतकेच नव्हे, तर या छोट्या आकाशगंगांनी ब्रह्मांडाच्या परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवून आणला.
‘डेली गॅलक्सी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, ही नवी शोध ब्रह्मांडाच्या उत्पत्तीबाबत आपल्या समजुतीलाच बदलून टाकू शकते. तसेच, ती आकाशगंगांच्या निर्मिती, तारकांच्या उत्क्रांती आणि डार्क मॅटर वितरणाच्या विद्यमान मॉडेल्सना आव्हान देऊ शकते. वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, या अभ्यासात आकाशाच्या केवळ एका लहानशा भागाचा समावेश आहे. आता ते इतर कॉस्मिक लेंसिंग क्षेत्रांचा अभ्यास करून डेटा विस्तारित करण्याच्या तयारीत आहेत. हा शोध केवळ भूतकाळ उलगडत नाही, तर ब्रह्मांडाच्या भविष्यातील प्रश्न आणि शक्यताही समोर आणते. त्यामुळे आपल्या ब्रह्मांडाविषयीचे ज्ञान आणखी सखोल आणि व्यापक होण्याची शक्यता आहे.