Slowest Animal in Ocean | समुद्रातील सर्वात मंद प्राणी कोणता?

Slowest Animal in the Ocean
Slowest Animal in Ocean | समुद्रातील सर्वात मंद प्राणी कोणता?Pudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : चित्त्याचा वेग आणि गरुडाची झेप यासारख्या गोष्टी आपल्याला नेहमीच आकर्षित करतात; पण निसर्गाच्या दुनियेत असेही काही जीव आहेत, ज्यांनी वेगाला नव्हे, तर मंदपणालाच आपल्या जगण्याचे शस्त्र बनवले आहे. त्यांच्यासाठी, गती ही यशाची गुरुकिल्ली नाही; मग जगातील सर्वात मंद प्राणी कोणता? आणि वेगवान नसतानाही ते आपले अस्तित्व कसे टिकवतात?

लंडनच्या प्रसिद्ध नॅचरल हिस्ट्री म्युझियममधील मत्स्य विभागाचे वरिष्ठ क्युरेटर जेम्स मॅक्लेन यांच्या मते, ‘आपल्या मनात वेगाबद्दल एक सकारात्मक भावना असते; पण अनेक प्राण्यांसाठी वेगाचा काहीच उपयोग नसतो.’ निसर्गात टिकून राहण्यासाठी प्रत्येक प्राण्याने स्वतःची वेगळी रणनीती विकसित केली आहे आणि त्यात मंदपणा हादेखील एक प्रभावी मार्ग आहे. गती मोजण्याच्या पद्धतीनुसार सर्वात मंद प्राण्याचा मान बदलू शकतो; पण जर विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेतला, तर दोन जीव या शर्यतीत आघाडीवर आहेत.

सी अ‍ॅनिमोन : हा समुद्रातील जीव जगातील सर्वात मंद प्राणी ठरू शकतो. तो एका तासात फक्त 4 ते 6 इंच (10 ते 25 सें.मी.) अंतर कापू शकतो, तेही फक्त नवीन जागा शोधताना. अन्यथा, तो एकाच जागी स्थिर राहतो.

ड्वार्फ सीहॉर्स : हा जगातील सर्वात हळू पोहणारा जलचर मानला जातो. त्याची सरळ पोहण्याची पद्धत आणि लहान पाठीचा पर, यामुळे त्याला वेग पकडता येत नाही. मॅक्लेन सांगतात, ‘या सीहॉर्सला (समुद्री घोडा) केवळ दीड मीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागतो.’ तुम्हाला प्रश्न पडेल की, इतके मंद असूनही हे जीव शिकारी कसे टाळतात? याचे उत्तर त्यांच्या जीवनशैलीत दडले आहे.

ड्वार्फ सीहॉर्स आपले आयुष्य सागरी गवताला आपल्या लांब शेपटीने धरून घालवतो. त्याला शिकारीसाठी धावपळ करावी लागत नाही; कारण लहान कवचधारी जीव स्वतःच त्याच्या जवळून जातात आणि त्याचे खाद्य बनतात. मॅक्लेन स्पष्ट करतात, ‘अन्न त्याच्याकडे चालून येते, त्यामुळे त्याला वेगवान असण्याची गरजच नाही.’ याशिवाय, या प्राण्यांचे शरीर हाडांच्या संरक्षणात्मक पट्ट्यांनी बनलेले असते, जे एका मजबूत चिलखताप्रमाणे काम करते. त्यामुळे शिकारी प्राणी सहजासहजी त्यांच्यावर हल्ला करत नाहीत आणि त्यांना पळून जाण्याची गरज भासत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news