

फ्लोरिडा : जेव्हा बहुतेक लोक वयाच्या 80 व्या वर्षी आरामखुर्ची आणि शांत आयुष्याची निवड करतात, तेव्हा किम नॉर या आकाशाला गवसणी घालत होत्या. 86 व्या वर्षीही त्यांचा उत्साह गुरुत्वाकर्षणालाही मात देत आहे. ज्या वयात लोक जगण्याची इच्छा सोडून देतात, अशा नाजूक वयात किम नॉर यांनी आपल्या जिद्दीने एक नवा इतिहास रचला आहे.
‘स्कायडायव्हिंग ग्रँडमा’ आणि ‘स्कायडायव्हिंग डीवा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या किम नॉर यांनी नुकतीच आपली 1,000 वी स्कायडाइव्ह पूर्ण केली. फ्लोरिडातील न्यू वेल्स येथे त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्यांनी ही उडी आपल्या दोन मुलींसोबत घेतली. हा क्षण केवळ थरारकच नव्हता, तर त्यांच्या जिद्दीचे आणि जिवंतपणाचे एक सुंदर उदाहरण ठरला किम नॉर यांच्या या कामगिरीने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वयाची कोणतीही अट नसते.
1000 स्कायडाइव्ह पूर्ण केल्याबद्दल त्यांना ‘युनायटेड स्टेटस् पॅराशूट असोसिएशन’चा सर्वोच्च सन्मान ‘गोल्ड विंग्स अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांच्या प्रदीर्घ, साहसी आणि प्रेरणादायी कारकिर्दीचा गौरव आहे. किम नॉर यांनी अनेक दशकांपासून आकाशालाच आपले घर मानले आहे. वयाच्या 86 व्या वर्षीही त्यांचा आत्मविश्वास आणि साहस तरुणांना लाजवेल असाच आहे. 1000 व्या उडीनंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.