

हैदराबाद : आजच्या युगात कामानिमित्त शहरांकडे होणारे स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि घरातील छोट्या-मोठ्या वादांमुळे आज एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनेक कुटुंबे स्वतंत्र राहण्याला प्राधान्य देत असताना, आंध्र प्रदेशातील एक कुटुंब मात्र अजूनही एकतेचा आदर्श जपत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली गावातील नागप्पा कुटुंब हे याचे उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबात तब्बल ८३ सदस्य असून सहा पिढ्या एकत्र राहतात. या कुटुंबामध्ये ६ सासू, १४ सुना आणि २० मुलं व इतर वडीलधारी मंडळी आहे.
नागप्पा कुटुंबातील सदस्य एकमेकांना लागून असलेल्या चार घरांमध्ये राहत असले, तरी त्यांच्या नात्यांमध्ये कोणतेही अंतर नाही. हे संपूर्ण कुटुंब स्वतःला एकच घटक मानते. या घरामध्ये जेवण एकत्र बनवले जाते, घरखर्च वाटून घेतला जातो आणि घरकामापासून शेतीपर्यंतच्या जबाबदाऱ्या सर्वजण मिळून पार पाडतात. तसेच घरातील वडीलधारी मंडळी अनेक महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतात. कुटुंबाचे प्रमुख हनुमंतरायडू यांच्या म्हणण्यानुसार, घरातील वडीलधारी मंडळी दररोज सकाळी चहा-कॉफी घेत एकत्र बसतात. तेव्हा त्यावेळी दिवसातील कामे, जेवणाचे पदार्थ आणि शेतीची कामे ठरवली जातात.
काही सदस्य शेतात काम करतात, तर महिला घरातील स्वयंपाक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळतात. नागप्पा कुटुंबाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांच्या एवढ्या मोठ्या घरात असलेलं एकच स्वयंपाकघर. या घरातील सुना मिळून स्वयंपाक करतात, तर वडीलधारी मंडळी किराणा आणि आवश्यक वस्तू आणून देण्याचं काम करतात. तर या कुटुंबाचे उत्पन्न हे शेती व्यवसाय आणि वाहतूक व्यवसायातून मिळते. एवढेच नाहीतर कुटुंबाकडे श्री कृष्ण हनुमान ट्रॅव्हल्सच्या बसगाड्या आहेत, ज्या कल्याणदुर्गम आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये धावतात.
मतभेद प्रत्येक मोठ्या कुटुंबात होतात, पण नागप्पा कुटुंबातील सदस्य दिवस संपण्यापूर्वी चर्चा करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. आदर, सहकार्य आणि जबाबदारीची भावना हीच त्यांच्या एकतेची खरी ताकद आहे. या कुटुंबाकडे सुमारे १२० एकर शेतजमीन आहे, ज्यावर भुईमूग, टोमॅटो, वांगी, टरबूज, पपई आणि मिरची यांसारखी पिकांची लागवड केली जाते. याशिवाय त्यांच्याकडे अंदाजे १००० मेंढ्या, ७० म्हशी, तीन ट्रॅक्टर, एक बोलेरो आणि एक आयशर ट्रक आहेत. या कुटुंबात आजही पारंपरिक पद्धतीने मातीच्या चुलींवर स्वयंपाक केला जातो.