

हैदराबाद : ‘उंच शरीरयष्टी म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्त्व’ असे सामान्यतः म्हटले जाते. मात्र, हीच उंची जेव्हा अडचणीचे कारण ठरते, तेव्हा परिस्थिती काय असेल? सध्या हैदराबादमधील एका बस कंडक्टरची गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आपली मेहनत किंवा कामापेक्षा ही व्यक्ती आपल्या उंचीमुळे प्रकाशझोतात आली आहे.
अमीन अहमद अंसारी हे तेलंगणा राज्य रस्ते परिवहन महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची उंची सुमारे 198 सेंटीमीटर म्हणजेच साधारण 6 फूट 6 इंच आहे. सामान्यतः, ही उंची आकर्षक मानली जाते; पण अमीन यांच्यासाठी ती शारीरिक त्रासाचे कारण ठरली. मेहदीपट्टनम डेपोमध्ये कार्यरत असताना, बसच्या छताची उंची त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच कमी पडत होती. प्रवाशांचे तिकीट काढताना किंवा चालत्या बसमध्ये वावरताना त्यांना सतत मान झुकवून काम करावे लागत असे. यामुळे त्यांचा दैनंदिन प्रवास आणि काम अत्यंत जिकिरीचे झाले होते. सतत झुकून काम केल्यामुळे अमीन यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. त्यांना मान, पाठ आणि मणक्याचा तीव्र त्रास सुरू झाला. हा त्रास इतका वाढला की, त्यांना चालणे-फिरणेही कठीण झाले होते.
यापूर्वी महामंडळाने त्यांना काही काळ विशेष ड्युटी दिली होती. परंतु, ती ड्युटी संपताच पुन्हा बसमध्ये काम सुरू केल्यावर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्या वेदना पुन्हा वाढल्या. अमीन यांची ही अवस्था पाहून त्यांच्या सहकार्यांनीही चिंता व्यक्त केली होती. जेव्हा अमीन यांच्या प्रकृतीची माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचली, तेव्हा प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला. 5 मे रोजी तेलंगणा परिवहन विभागाने आदेश जारी करून त्यांना पुन्हा विशेष ड्युटीवर नियुक्त केले आहे. त्यांना आता बसमध्ये उभे राहून तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. त्यांच्याकडे आता प्रशासकीय काम, बस पास विभाग किंवा एअरपोर्ट सेक्शनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.