

कोहिमा (नागालँड) : नागालँड विद्यापीठाच्या संशोधकांनी सिनॅपिक अॅसिड नावाचे नैसर्गिक वनस्पती संयुग शोधून काढले आहे. ही वनस्पती मधुमेहींच्या जखमा भरून काढण्याची प्रक्रिया लक्षणीयरीत्या वाढवते. या शोधामुळे मधुमेह व्यवस्थापनाच्या (डायबेटिक्स मॅनेजमेंट) क्षेत्रात सुरक्षित, नैसर्गिक आणि परवडणार्या उपचारांची नवी आशा निर्माण झाली आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, या शोधाचे अनेक महत्त्वपूर्ण परिणाम अपेक्षित आहेत.
मधुमेह झालेल्या रुग्णांना पायाला झालेल्या जखमांमुळे अनेकदा अवयव कापून टाकण्याचा धोका असतो; सिनॅपिक अॅसिडमुळे हा धोका कमी होऊ शकतो. हे संयुग विविध खाद्य वनस्पतींमध्ये आढळणारे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असल्याने, ते ग्रामीण आणि संसाधनांची कमतरता असलेल्या भागांतील रुग्णांसाठी स्वस्त आणि तोंडावाटे घेता येणारा उपचार ठरू शकते. हे संयुग ऊतींची दुरुस्ती (ट्यूश्यू रिपेअर) वाढवते, दाह कमी करते आणि नवीन रक्तवाहिन्यांची निर्मिती करते, ज्यामुळे जखमा लवकर बर्या होतात.
नागालँड विद्यापीठाचे (तंत्रज्ञान विभाग) प्रा. प्रणव कुमार प्रभाकर यांच्या नेतृत्वाखालील आणि पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने झालेल्या या आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे निष्कर्ष नेचर सायंटिफिक रिपोर्टस् या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. तोंडावाटे दिल्यावर सिनॅपिक अॅसिड मधुमेहाच्या जखमा बर्या करण्यास गती देते, हे दाखवणारा हा जगातील पहिला अभ्यास असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. नागालँड विद्यापीठाचे उपकुलगुरू जगदीश के. पटनाईक म्हणाले, हा शोध केवळ आमच्या वैज्ञानिक समुदायाची क्षमता दर्शवित नाही, तर निसर्गात रुजलेल्या नवोपक्रमातून आरोग्य आव्हानांना तोंड देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.