Science Secrets | अंतराळात पाण्याचे दोन थेंब एकत्र येतात तेव्हा...

शुभांशू शुक्ला यांनी उलगडले विज्ञानाचे रहस्य!
Science Secrets |
Science Secrets | अंतराळात पाण्याचे दोन थेंब एकत्र येतात तेव्हा...
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी नुकताच अंतराळातील एक अत्यंत रंजक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तरंगणारे पाण्याचे दोन थेंब एकमेकांत मिसळून एक मोठा थेंब कसा तयार करतात, हे पाहायला मिळते. या साध्या प्रयोगाच्या माध्यमातून अंतराळात द्रवपदार्थ कसे वागतात (Fluid Dynamics) यामागील विज्ञान त्यांनी उलगडून दाखवले असून, संशोधकांना याचा कसा उपयोग होतो हेही स्पष्ट केले आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना शुक्ला यांनी सांगितले की, त्यांनी हवेत तरंगणारे पाण्याचे दोन मोठे थेंब एकत्र आणले आणि ते एकमेकांत कसे विलीन होतात हे पाहिले. दिसायला ही कृती अत्यंत साधी वाटत असली, तरी त्यातून भौतिकशास्त्राचा एक अतिशय मनोरंजक धडा शिकायला मिळतो, असे ते म्हणाले. या प्रयोगामागील विज्ञान स्पष्ट करताना शुक्ला म्हणाले की, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये द्रवपदार्थांच्या वर्तनाला आकार देण्यात ‘पृष्ठताण’ (Surface Tension) खूप मोठी भूमिका बजावतो. कारण, अशा परिस्थितीत गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे परिणाम, जसे की प्लावकता (Buoyancy) आणि द्रवाचे खाली स्थिरावणे (Settling), नगण्य होतात.

अंतराळात पाण्याशी खेळणे मजेशीर असते; पण कधीकधी या मजेसोबत भौतिकशास्त्राचा एक रंजक धडाही मिळतो! तुम्ही येथे पाहत आहात की मी पाण्याचे दोन तरंगते गोळे एकत्र आणतो. ते एकमेकांना स्पर्श करताच त्यांचा एकच मोठा गोळा तयार होतो. पाहायला हे अगदी साधे वाटते; पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते अत्यंत आकर्षक आहे. तर इथे नेमके काय घडत आहे? सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात गुरुत्वाकर्षण-आधारित परिणाम नगण्य असल्याने द्रवाच्या वर्तनावर पृष्ठताणाचा प्रभाव खूप जास्त असतो. पाण्याचा नैसर्गिक कल आपले पृष्ठफळ (Surface Area) कमीत कमी ठेवण्याकडे असतो, आणि जेव्हा दोन थेंब एकमेकांना स्पर्श करतात, तेव्हा पृष्ठताणामुळे ते एकत्र येऊन एक मोठा थेंब तयार करतात.

या प्रक्रियेत बाहेर पडणारी ऊर्जा नाहीशी होत नाही, तर तिचे रूपांतर नवीन तयार झालेल्या थेंबाच्या हालचालींमध्ये आणि कंपनांमध्ये (Oscillations) होते. द्रवातील चिकटपणाच्या बलामुळे (Viscous forces) ही ऊर्जा हळूहळू कमी होत जाते आणि कंपने थांबतात. विशेष म्हणजे, द्रवाची स्निग्धता (Viscosity) आणि पृष्ठताण यांसारखे गुणधर्म समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ थेंब एकत्र येण्याचा वेग आणि त्यानंतरच्या हालचालींचा अभ्यास करू शकतात. अंतराळयानातील इंधन व्यवस्थापन प्रणाली (Propellant Management Systems) डिझाईन करताना याचा विशेष उपयोग होतो, जिथे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात टाक्यांमध्ये द्रव कसे हलतात आणि वागतात हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.