

बीजिंग : दक्षिण तिबेटमधील आटत चाललेले प्रचंड मोठे तलाव भूगर्भातील सुप्त स्थितीतील ‘फॉल्टस्’ (भेगा) सक्रिय करून भूकंपाला निमंत्रण देऊ शकतात, असा खळबळजनक दावा संशोधकांनी केला आहे. पृथ्वीचे हवामान आणि भूगर्भातील हालचाली यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
सुमारे 1,15,000 वर्षांपूर्वी दक्षिण तिबेटमध्ये विस्तीर्ण तलाव होते, ज्यांची लांबी 125 मैलांपेक्षा (200 कि.मी.) जास्त होती. आज हे तलाव खूपच लहान झाले आहेत. उदाहरणार्थ, ‘नामत्सो’ (Nam Co) तलाव जो एकेकाळी अवाढव्य होता, तो आता केवळ 45 मैल (75 कि.मी.) लांब उरला आहे. बीजिंगमधील ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस’चे संशोधक चुनरुई ली यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावर प्रकाश टाकला आहे. संशोधनानुसार विशाल तलावांमधील पाण्याचे वजन पृथ्वीच्या कवचावर दाब निर्माण करते. जेव्हा हे तलाव सुकतात, तेव्हा कवचावरील वजन हलके होते.
ज्याप्रमाणे मालवाहू जहाजातून सामान काढल्यावर ते पाण्यावर वर उचलले जाते, त्याचप्रमाणे पृथ्वीचे कवच हळूहळू वर सरकू लागते. दक्षिण तिबेटमध्ये भारत आणि युरेशिया या खंडांच्या टकरीमुळे आधीच मोठा ताण निर्माण झाला आहे. येथील भूगर्भात अनेक प्राचीन भेगा आहेत. तलावांचे पाणी कमी झाल्यामुळे कवच वर सरकते आणि या भेगांना ‘धक्का’ लागून त्या सक्रिय होतात, ज्यामुळे भूकंप होतात. संशोधकांनी प्राचीन तलावांच्या किनारपट्टीचा अभ्यास करून किती पाणी कमी झाले याचा अंदाज लावला. त्यानंतर संगणकीय मॉडेल्सचा वापर करून हे सिद्ध केले की, या बदलांमुळे जवळील ‘फॉल्टस्’ पुन्हा सक्रिय झाले असावेत. हे संशोधन 17 जानेवारी रोजी ‘जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.