वॉशिंग्टन : डिजिटल मेसेजिंगच्या या युगात मेसेज पाठवत असताना मेसेज पूर्ण न लिहिता तो संक्षिप्त रुपात अर्थात शॉर्टकटमध्ये पाठवण्याचा ट्रेंड यापूर्वीच सेट होत आला आहे. आपण कसे आहात हे विचारण्यासाठी hru आणि गुड नाईट, गुड मॉर्निंगसाठी gn, gm यासारखे शब्द वापरणे प्रचलित झाले आहे. मात्र, संशोधकांनी केलेल्या या अभ्यासात टेक्स्ट अशा संक्षिप्त स्वरुपात लिहिल्याने त्याची परिणामकता कमी होते आणि त्याचा प्रभावही कमी होत जातो, असे आढळून आले आहे. याशिवाय, इतके कमी की काय म्हणून यात शॉर्ट मेसेज पाठवणार्या व्यक्तीत प्रामाणिकपणाची भावनाही कमी होते, असेही अभ्यासात म्हटले आहे. जवळपास 5 हजार व्यक्तींवर अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, जे युझर शॉर्ट मेसेज पाठवतात, त्यांच्यात प्रामाणिकपणाची भावना कमी असतेच. शिवाय, अशा शॉर्ट मेसेजला उत्तरे कमी प्रमाणात दिली जातात आणि जी उत्तरे दिली जातात, तीही बहुतांशी करून शॉर्टच असतात. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजीच्या संशोधकानुसार, शॉर्ट मेसेज लिहिल्याने थोडा वेळ जरूर वाचतो. मात्र, त्यामुळे त्याची परिणामकताच कमी होते.
मेसेज ज्या पद्धतीने पाठवले जातात, त्यावरही या संशोधकांनी आपल्या अभ्यासात भर दिला. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी व टोरोंटो युनिव्हर्सिटीच्या पथकाने केलेल्या या अभ्यासात शॉर्ट मेसेजला उत्तर म्हणूनही शॉर्ट मेसेजच पाठवले गेले आणि यामुळे फिलबॅक लूपची शक्यता वाढत राहते, असे नमूद आहे. आपण कशा प्रकारचे संदेश पाठवतो, त्यावरूनही आपले व्यक्तिमत्त्व ओळखता येते, असे संशोधक यात म्हणतात. कोणत्याही मेसेजला उत्तर देताना युझर विविध बाबींचा विचार करतो. एकीकडे, शॉर्ट मेसेजला शॉर्ट उत्तर देण्याची मानसिकता तर असतेच. त्याही शिवाय, ज्या युझरशी आपण संवाद साधत आहोत, त्याच्याशी आपला स्नेह कितपत आहे, मेसेजला रिप्लाय देण्याची गरज कितपत आहे, यावर देखील बरेच काही अवलंबून असते, असे या संशोधकांनी म्हटले आहे.