

फ्लोरिडा : अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या पूर्व किनार्याजवळ बुडालेल्या एका ऐतिहासिक जहाजाच्या अवशेषातून डायव्हर्सनी 1,000 हून अधिक नाणी आणि इतर दुर्मीळ सोन्याच्या वस्तू बाहेर काढल्या आहेत. ही नाणी 1715 मध्ये बुडालेल्या प्रसिद्ध ‘ट्रेझर फ्लीट’ नावाच्या स्पॅनिश जहाजांच्या समूहाचा भाग आहेत. जुलै 1715 मध्ये, जेव्हा हे जहाज वादळामुळे बुडाले तेव्हा शेकडो खलाशी आणि 400 दशलक्ष डॉलरहून अधिक किमतीचे सोने-चांदी समुद्रात गडप झाले होते.
जहाजाचे अवशेष काढण्याचे काम करणार्या ‘1715 फ्लीट - क्वीन्स ज्वेल्स’ या कंपनीच्या प्रतिनिधींनी एका निवेदनात सांगितले की, त्यांना 1,000 हून अधिक चांदीचे रिएल्स, ज्यांना ‘पीसेस ऑफ एट’ असेही म्हणतात, तसेच पाच सोन्याचे एस्क्युडोस आणि इतर दुर्मीळ सोन्याच्या कलाकृती मिळाल्या आहेत. हे दोन्ही प्रकारचे नाणे अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींमध्ये सामान्य चलन म्हणून वापरले जात होते. ‘1715 फ्लीट - क्वीन्स ज्वेल्स’चे ऑपरेशन्स संचालक सॅल गुट्टुसो यांनी सांगितले, ‘प्रत्येक नाणं इतिहासाचा एक तुकडा आहे, स्पॅनिश साम्राज्याच्या सुवर्णयुगात जगलेल्या, काम केलेल्या आणि प्रवास केलेल्या लोकांशी जोडलेला दुवा आहे.
एकाच वेळी 1,000 नाणी मिळणे हे दुर्मीळ आणि विलक्षण आहे.’ ही नाणी बहुधा मेक्सिको, पेरू आणि बोलिव्हिया या स्पॅनिश वसाहतींमध्ये पाडलेली असावीत. काही नाण्यांवर टकसाळीचे चिन्ह आणि स्पष्ट तारखा आहेत. त्यांची उत्कृष्ट स्थिती दर्शवते की ती नाणी एकाच संग्रहाचा भाग होती, जी जहाज तुटल्यावर सांडली आणि त्वरित गाडली गेली. ‘प्लेट फ्लीट‘ म्हणून ओळखला जाणारा हा 1715 चा जहाजी समूह स्पॅनिश वसाहतींमधून नाणी आणि इतर उत्पादनांनी भरलेला होता. 24 जुलै रोजी 12 जहाजे क्युबाहून स्पेनकडे त्यांच्या वार्षिक प्रवासासाठी निघाली होती.
अवघ्या काही दिवसांतच, फ्लोरिडाच्या पूर्व किनारपट्टीवर त्यांना एका तीव्र समुद्री वादळाचा सामना करावा लागला. यात अकरा जहाजे बुडाली आणि त्यांचे अवशेष 80 किलोमीटरच्या (50 मैल) पट्ट्यात विखुरले गेले. या दुर्घटनेनंतर काही खजिना लगेचच काढला गेला; पण त्यातील मोठा भाग अनेक शतके समुद्राखालीच राहिला. गुट्टुसो पुढे म्हणाले, ‘प्रत्येक शोधामुळे 1715 च्या जहाजी समूहाची मानवी कहाणी जोडण्यास मदत होते.’ ही नाणी स्थानिक संग्रहालयांमध्ये जतन करून जनतेसाठी प्रदर्शित केली जातील, असे निवेदनात म्हटले आहे.