

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो व्हिडीओ अपलोड होत असतात; पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे, जो पाहण्यासाठी तुमचे आयुष्यही कमी पडेल. यूट्यूबवर ‘@ShinyWR’ नावाच्या चॅनेलने एक व्हिडीओ अपलोड केला आहे, ज्याची लांबी चक्क 140 वर्षांपेक्षा जास्त दाखवली जात आहे.
या व्हिडीओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कंटेंटच्या नावावर काहीही नाही. जर तुम्ही हा व्हिडीओ सुरू केलात, तर तुम्हाला केवळ काळी स्क्रीन दिसेल आणि कोणताही आवाज ऐकू येणार नाही. असे असूनही, आतापर्यंत 20 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून, त्यावर 29 हजारांहून अधिक कमेंटस् आल्या आहेत. जेव्हा तुम्ही यूट्यूबवर हा व्हिडीओ पाहता, तेव्हा त्याची लांबी 140 वर्षे दिसते.
मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जसा तुम्ही व्हिडीओ ‘प्ले’ करता, तशी त्याची वेळ कमी होऊन ती फक्त 12 तासांवर येते. काही यूजर्स याला यूट्यूबची तांत्रिक त्रुटी किंवा ‘टेस्ट व्हिडीओ’ मानत आहेत, तर अनेकांसाठी हे एक न उलगडलेले रहस्य आहे. हा व्हिडीओ केवळ त्याच्या लांबीमुळेच नाही, तर त्यामागील काही इतर कारणांमुळेही चर्चेत आहे : व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही अक्षरे लिहिली आहेत, ज्याचा अनुवाद ‘या, मला नरकात भेटा’ असा होतो. चॅनेलच्या प्रोफाईलनुसार, हे चॅनेल उत्तर कोरियातून चालवले जात असल्याचे दिसते. याच चॅनेलवर 294 तासांचा व्हिडीओ आणि 300 तासांचे लाइव्ह स्ट्रीम देखील उपलब्ध आहे.
यूट्यूबवर अशा प्रकारचे प्रयोग पहिल्यांदाच होत आहेत असे नाही. 2011 मध्ये जोनाथन हार्चिक यांनी 596 तासांचा व्हिडीओ अपलोड करून विक्रम केला होता. यापूर्वी 23 दिवसांचा लांब व्हिडीओ आणि अवघ्या 5 सेकंदांचा व्हिडीओ 19 तासांपर्यंत ओढण्याचेही प्रकार घडले आहेत. इंटरनेटवर सध्या या व्हिडीओवरून चर्चा सुरू आहे की, इतक्या मोठ्या व्हिडीओवर जाहिराती कशा येत असतील आणि यातून किती कमाई होत असेल? मात्र, या विचित्र व्हिडीओमागचा खरा उद्देश काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.