Sharada Peeth history | प्राचीन भारतातील विद्येचे माहेरघर...काश्मीरचे शारदापीठ

Sharada Peeth history
Sharada Peeth history | प्राचीन भारतातील विद्येचे माहेरघर...काश्मीरचे शारदापीठ
Published on
Updated on

मुझफ्फराबाद/श्रीनगर : आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये भग्नावस्थेत असलेल्या शारदा पीठाच्या भिंती एकेकाळी वेदांच्या जयघोषाने आणि विद्वानांच्या चर्चेने दुमदुमत होत्या. ‘शारदा देश’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या भूमीतील शारदा पीठ हे प्राचीन काळातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आणि महत्त्वाचे शक्तीपीठ मानले जाते. देवी सरस्वतीला समर्पित असलेल्या या मंदिराच्या इतिहासातील सर्वात सुवर्णक्षण म्हणजे आद्य शंकराचार्य यांचे येथे झालेले आगमन. जेव्हा शंकराचार्य भारतभ्रमण करत काश्मीरमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी शारदा पीठाच्या ‘सर्वज्ञ पीठा’वर (सर्व ज्ञान प्राप्त असलेल्यांचे आसन) बसण्याचे आव्हान स्वीकारले.

या पीठावर बसण्यापूर्वी शंकराचार्यांना दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा चारही दिशांच्या विद्वानांशी शास्त्रार्थ करावा लागला. तर्कशास्त्र, दर्शन आणि वेदांतातील आपल्या अगाध ज्ञानाने सर्व विद्वानांना पराभूत करून आचार्य दक्षिण दरवाज्यातून मंदिरात प्रविष्ट झाले आणि त्यांनी ‘सर्वज्ञ पीठा’वर आरोहण केले. या घटनेने शारदा पीठाची मोहोर संपूर्ण आर्यावर्तात उमटली. प्राचीन काळी शारदा पीठाचे वैभव नालंदा किंवा तक्षशिलेपेक्षा कमी नव्हते. येथे केवळ भारतच नव्हे, तर तिबेट, चीन आणि मध्य आशियातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. याला ‘शारदा विद्यापीठ’ म्हटले जाई.

आज आपण वापरत असलेल्या अनेक लिपींचे मूळ असलेल्या ‘शारदा लिपी’चा उगम आणि विकास याच ठिकाणी झाला. येथे एक अत्यंत समृद्ध ग्रंथालय होते, ज्याचा संदर्भ घेण्यासाठी महान व्याकरणकार पाणिनी आणि हेमचंद्राचार्य यांसारखे ॠषीमुनी येथे येत असत. हे मंदिर काश्मिरी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना होते. उंच दगडी भिंती, विस्तीर्ण प्रांगण आणि नीलम नदीच्या काठी असलेले याचे स्थान अत्यंत मनमोहक होते. ‘शक्ती’ आणि ‘विद्या’ यांचे हे एकत्रित अधिष्ठान मानले जाई. काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणांमुळे या मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सध्या हे मंदिर नियंत्रण रेषेच्या (एलओसी) अतिशय जवळ असून, केवळ अवशेषरूपात उरले आहे. मात्र, आजही हिंदू धर्मात शारदा पीठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी’ या श्लोकाद्वारे आजही जगभरातील हिंदू या पीठाची वंदना करतात. काश्मिरी पंडितांकडून आणि भारत सरकारकडून या पीठाच्या पुनरुद्धारासाठी आणि ‘शारदा कॉरिडॉर’ सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून या महान सांस्कृतिक वारशाचे दर्शन भाविकांना पुन्हा घेता येईल. शुक्रवारी वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती पूजनाच्या दिवशी या पीठाचे स्मरण अनेकांना होणे अपरिहार्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news