न्यूयॉर्क : 'भगवान देता है तो छप्पर फाड के' असे म्हटले जाते, ते काही खोटे नाही. मॅसाच्युसेट्समधील एका माणसाला त्याची नुकतीच प्रचिती आली. या माणसाला चार वर्षांपूर्वी दहा लाख डॉलर्सचा म्हणजेच सात कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला होता. आता पुन्हा एकदा या भाग्यवंताला सात कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला आहे.
स्टीफन टोटो असे या माणसाचे नाव. त्याने फ्रामिंघममधील 'ए-1 गल्फ स्टोअर'मध्ये हे तिकीट खरेदी केले होते. खरे तर त्याला असे लॉटरी तिकिट खरेदी करण्याची कोणतीही इच्छा नव्हती; मात्र ज्यावेळी तो काऊंटरवर पोहोचला त्यावेळी दुकानदाराच्या इच्छेनुसार त्याने एक तिकीट खरेदी केले. नशिबाने त्याला यावेळीही साथ दिली आणि याच तिकिटाला पुन्हा एकदा दहा लाख डॉलर्सचा म्हणजेच सात कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला. स्टीफनने 2017 मध्ये स्क्रॅच-ऑफ तिकिटावर दहा लाख डॉलर्स जिंकले होते. आता पुन्हा एकदा जॅकपॉट लागल्याने खुद्द स्टीफन आश्चर्यचकित झाला आहे.