

वॉशिंग्टन : २३ सप्टेंबरला ‘इक्वीनॉक्स’ म्हणजेच ‘विषुव’ची खगोलीय घटना अनेकांनी अनुभवली, ज्यावेळी दिवस आणि रात्र दोन्ही समान कालावधीचे असतात. उत्तर गोलार्धात या घटनेला हिवाळ्याच्या आगमनाचा संकेत मानले जाते. सूर्यपरिक्रमा करणाऱ्या पृथ्वीच्या प्रवासातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या खगोलीय घटनेला ‘सप्टेंबर विषुव’ किंवा ‘शरद विषुव’ म्हणून ओळखले जाते. दुसरीकडे, दक्षिण गोलार्धात ही घटना वसंत ऋतूच्या सुरुवातीचे प्रतीक मानली जाते.
अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’च्या गणनेनुसार, भारतीय वेळेनुसार सप्टेंबर विषुवाची घटना २३ सप्टेंबरला सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी घडली. जेव्हा पृथ्वी आपल्या परिभ्रमण मार्गावर अशा ठिकाणी पोहोचते जिथे सूर्याचे केंद्र थेट विषुववृत्त रेषेला ओलांडते, तेव्हा त्याला ‘इक्विनॉक्स’ म्हटले जाते. या काळात सूर्याची किरणे पृथ्वीवर थेट (लंबरूप) पडतात. ही घटना वर्षातून दोनदा घडते, पहिल्यांदा मार्चमध्ये आणि दुसऱ्यांदा सप्टेंबरमध्ये. ‘इक्विनॉक्स’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘एक्वस’ (समान) आणि ‘नॉक्स’ (रात्र) या दोन शब्दांपासून बनला आहे. याचा अर्थ ‘समान रात्र’ असा होतो. या दिवशी पृथ्वीवर दिवस आणि रात्र दोन्ही १२-१२ तासांचे असतात असे मानले जाते, जरी वैज्ञानिकदृष्ट्या त्यात काही मिनिटांचा किरकोळ फरक असतो.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती (धुरी) फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. परंतु, पृथ्वी तिच्या अक्षावर पूर्णपणे सरळ नसून सुमारे २३.५ अंशांनी कललेली (झुकलेली) आहे. जशी जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसतसा हा कलच ठरवतो की उत्तर आणि दक्षिण गोलार्धांवर सूर्याचा प्रकाश किती प्रमाणात पडेल. विषुवाच्या वेळी एक दुर्मीळ खगोलीय स्थिती निर्माण होते, जिथे कोणताही गोलार्ध दुसऱ्याच्या तुलनेत सूर्याकडे जास्त झुकलेला नसतो. या काळात सूर्य थेट विषुववृत्ताच्या वर असतो आणि दोन्ही गोलार्धांना समान प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. या घटनेनंतर सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत विषुववृत्त ओलांडतो, ज्यामुळे उत्तर गोलार्धात हळूहळू दिवस लहान आणि रात्री मोठ्या होण्यास सुरुवात होते.