

नवी दिल्ली : साधारणपणे दुचाकी चालवताना डोक्यात हेल्मेट घालावे लागते आणि गाडी थांबल्यावर तोल सांभाळण्यासाठी पाय जमिनीवर टेकवावे लागतात. मात्र, बीएमडब्ल्यूने भारतात अशा एका अनोख्या इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटंट नोंदवले आहे, जी स्वतःचा तोल (बॅलन्स) स्वतःच सांभाळू शकते. इतकेच नव्हे, तर ही स्कूटर चालवण्यासाठी चालकाला हेल्मेट घालण्याचीही गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. ही स्कूटर अक्षरशः चारचाकी गाडीसारखी सुरक्षा देते. कंपनीने आपल्या ‘बीएमडब्ल्यू व्हिजन सीई’ या सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाईनचे भारतात पेटंट घेतले आहे.
अत्याधुनिक सेन्सर्स आणि इलेक्ट्रिक अॅक्ट्युएटर्सच्या मदतीने ही स्कूटर पूर्णपणे सेल्फ-बॅलन्सिंग तंत्रज्ञानावर काम करते. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये स्कूटर थांबवताना किंवा पुन्हा सुरू करताना चालकाला आपले पाय जमिनीवर टेकवावे लागणार नाहीत. दीर्घकाळ स्कूटर पार्क करून ठेवण्यासाठी किंवा ती बंद असताना बॅटरी व इतर घटकांवर ताण येऊ नये म्हणून यात एक मॅन्युअल स्टँड देण्यात आला आहे. स्कूटरचे इग्निशन सुरू करताच हा स्टँड आपोआप बाजूला होतो. या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तिची सुरक्षा यंत्रणा. ही स्कूटर चालवताना हेल्मेट, ग्लोव्हज किंवा रायडिंग गिअर वापरण्याची आवश्यकता भासणार नाही, अशा पद्धतीने तिची रचना केली आहे.
स्कूटरच्या भोवती ट्युब्युलर स्टीलचे एक मजबूत सुरक्षा कवच (केज) तयार करण्यात आले आहे. एखादा अपघात झाल्यास किंवा स्कूटर कलंडल्यास हे कवच चालकाचे डोके, पाय, खांदे आणि कमरेचे रक्षण करते. चालकाला सीटवर सुरक्षित ठेवण्यासाठी कारप्रमाणे यात ४-पॉईंट सीटबेल्ट बसवण्यात आला आहे. सुरक्षा केज, बॅकरेस्ट आणि हँडलवर मऊ फोमचे कुशनिंग दिले आहे. याशिवाय, संभाव्य अपघाताची पूर्वसूचना मिळण्यासाठी मागील बाजूस सेन्सिंग रडार आणि ड्रायव्हर-असिस्टन्स इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा बसवली आहे. बीएमडब्ल्यूने अद्याप या स्कूटरच्या तांत्रिक तपशिलांची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ही स्कूटर कंपनीच्या सध्याच्या ‘सीई ०४’ (CE 04) या इलेक्ट्रिक स्कूटरच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे.
‘बीएमडब्ल्यू सीई ०४’मध्ये ८.५ किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक असून, तो एका चार्जमध्ये १३० किलोमीटरची रेंज देतो. तिची मोटर ४२ एचपी पॉवर आणि ६२ एनएम टॉर्क निर्माण करते, तर तिचा कमाल वेग ताशी १२० किलोमीटर इतका आहे. अर्थात, व्हिजन सीई स्कूटरमध्ये सेफ्टी केज आणि अतिरिक्त वजनाचा विचार करून बॅटरी व मोटर क्षमतेत काही आवश्यक बदल केले जाऊ शकतात. भारतासह अनेक आघाडीच्या देशांमध्ये या अनोख्या स्कूटरचे पेटंट नोंदवण्यात आले आहे. कंपनीने अद्याप तिच्या उत्पादन योजनेविषयी किंवा ती बाजारात आणण्याच्या तारखेविषयी कोणताही खुलासा केलेला नसला, तरी पेटंट नोंदणी झाल्यामुळे नजीकच्या काळात ही भन्नाट स्कूटर रस्त्यांवर धावताना दिसेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.