Roman concrete | स्वतःच डागडुजी करणार्‍या रोमन काँक्रीटचे उलगडले रहस्य

Roman concrete
Roman concrete | स्वतःच डागडुजी करणार्‍या रोमन काँक्रीटचे उलगडले रहस्यPudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : रोमन काँक्रीट हे खरोखरच विलक्षण आहे. आजही प्राचीन रोमन वास्तुकलेविषयी आपल्याला इतकी माहिती मिळते, त्यामागे या मजबूत आणि टिकाऊ काँक्रीटचा मोठा वाटा आहे. रोमन लोकांनी उभारलेल्या अनेक इमारती, घरे, सार्वजनिक स्नानगृहे, पूल आणि रस्ते आजही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात टिकून आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची कल्पक बांधकाम पद्धत आणि उत्कृष्ट काँक्रीट तंत्रज्ञान. मात्र, एवढे भक्कम काँक्रीट रोमनांनी नेमके कसे तयार केले आणि इतक्या भव्य रचना कशा उभारल्या, याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रोमन बांधकाम स्थळांवरील प्रत्यक्ष भौतिक पुराव्यांची संशोधकांना दीर्घकाळ प्रतीक्षा होती. आता ही उणीव काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मॅसेच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील आणि ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासातून रोमन काँक्रीट आणि बांधकाम तंत्रांवर महत्त्वाचा प्रकाश पडला आहे.

हा अभ्यास इ.स. 79 मध्ये वेसुव्हियस ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे अर्धवट सोडून दिलेल्या पोम्पेई शहरातील बांधकाम स्थळावर आधारित आहे. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना कामगारांनी मध्येच सोडलेली काही खोल्या आणि रचना आजही तशाच अवस्थेत सापडल्या. या विशेष इमारत स्थळाचा शोध मागील वर्षीच चर्चेत आला होता. संशोधनातून असे दिसून आले की, पहिल्या शतकात वेसुव्हियसचा उद्रेक झाला, तेव्हा शहराच्या मध्यभागातील एका घराची प्रत्यक्ष दुरुस्ती सुरू होती. या ठिकाणी पुनर्वापरासाठी वेगवेगळ्या टाईल्स वेगळ्या करून ठेवल्या होत्या. तसेच बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँफोरा (मातीची मोठी भांडी) दारूच्या बाटल्यांचा पुन्हा वापर केला जात असल्याचेही पुरावे मिळाले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या स्थळावर काँक्रीट तयार करण्यापूर्वी कोरडे साहित्य आधीच तयार करून ठेवले जात असल्याचे ठोस पुरावे आढळले. हेच कोरडे साहित्य या नव्या अभ्यासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. काँक्रीटमध्ये पाणी मिसळण्यापूर्वी वापरली जाणारी ही मूळ सामग्री प्रत्यक्ष पाहायला मिळणे, संशोधकांसाठी एक दुर्मीळ संधी ठरली आहे. या साहित्यामध्ये पाणी मिसळल्यानंतर नेमक्या कोणत्या रासायनिक प्रक्रिया घडत असत आणि त्यामुळे रोमन काँक्रीट इतके टिकाऊ कसे बनत असे, हे समजून घेण्याच्या द़ृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या संशोधनामुळे प्राचीन रोमनांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे नवे पैलू उघड होण्याची शक्यता असून, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानालाही याचा फायदा होऊ शकतो, असा संशोधकांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news