

वॉशिंग्टन : नेपच्यूनच्या पलीकडे असणार्या एका रहस्यमय बिंदूच्या हालचालींमुळे खगोलशास्त्रज्ञांनी प्लॅनेट नाइन’ म्हणजेच नववा ग्रह असल्याची शक्यता वर्तवली आहे. हा ग्रह असल्यास तो आपल्या सौरमालेतील पहिल्यांदाच प्रत्यक्ष नजरेस पडणारा संभाव्य नववा ग्रह ठरू शकतो. तथापि, ही संकल्पना आजही वादग्रस्त आहे आणि या नवीन शोधामुळे मतमतांतरे मिटणार अशी शक्यता कमी आहे.
हा संशयास्पद ग्रह जुना उपग्रह डेटा तपासत असताना सापडला. आत्ताच्या घडीलाही हे फक्त काही इन्फ्रारेड छायाचित्रांतील हलणारे ठिपके आहेत. मात्र, हे ठिपके ज्या प्रकारे हालचाल करतात, ते पाहता ते कोणत्यातरी मोठ्या, दूर अंतरावर फिरणार्या ग्रहासारखे वाटतात, असं संशोधक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक टेरी फान यांनी सांगितलं. टेरी हे तैवानमधील नॅशनल त्सिंग हुआ विद्यापीठात पीएच.डी. करत आहेत. हा अभ्यास 24 एप्रिल रोजी arXiv प्रीप्रिंट साठी प्रकाशित करण्यात आला असून लवकरच “Publications of the Astronomical Society of Australia” या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार आहे. मात्र, या अभ्यासावर काही वैज्ञानिकांनी शंका व्यक्त केली आहे.
कॅलटेकच्या खगोलशास्त्रज्ञ माईक ब्राऊन, ज्यांनी 2016 मध्ये प्लॅनेट नाइन ही संकल्पना प्रथम मांडली होती, त्यांना या संशयित ग्रहावर विश्वास नाही. त्यांनी सांगितले की, या इन्फ्रारेड सिग्नलचा कक्षा कोणत्याही ज्ञात ग्रहांच्या तुलनेत 120 अंशांनी झुकलेली आहे, जी प्लॅनेट नाइनसाठी अपेक्षित असलेल्या 15-20 अंश झुकावापेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळे ब्राऊन यांच्या मते, ‘हा खगोलीय पिंड अस्तित्वात असला तरी तो प्लॅनेट नाइन नाही.
‘नवव्या ग्रहाची कल्पना कायपर बेल्टमधील काही वस्तूंच्या विचित्र कक्षांमागचं स्पष्टीकरण म्हणून मांडली गेली आहे. परंतु, अनेक वैज्ञानिक अजूनही याला पर्याय असलेली स्पष्टीकरणं मान्य करतात आणि अद्याप कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही. जर प्लॅनेट नाइन अस्तित्वात असेल, तर तो पृथ्वीपेक्षा मोठा असून नेपच्यूनच्या पलीकडे कोट्यवधी मैल दूर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. इतक्या अंतरावर असल्याने तो आपल्या दुर्बिणींसाठी सहज दिसणं कठीण आहे. हा नवा संशोधन गट 1983 सालचा IRAS उपग्रह आणि 2006-2011 दरम्यानचा AKARI उपग्रह यांच्या डेटामधून असे हळूहळू हालणारे बिंदू शोधत होता, जे प्लॅनेट नाइनप्रमाणे वागत असल्यास ग्रह मानले जाऊ शकतात.