

अहमदाबाद : तुम्ही आतापर्यंत समुद्रातील लाटांचा रौद्र अवतार पाहिला असेल. नदीमध्ये किंवा खाडीमध्येही कधीतरी लाटांसारखा पाण्याचा प्रवाह दिसून येतो. मात्र हे फारच क्वचित होते. असे असले तरी कधी विहिरीमध्ये अशा लाटा दिसल्याचे तुम्ही ऐकले नसेल, पण सध्या असा एक विचित्र प्रकार समोर आला असून संपूर्ण भरलेला ग्लास हलवल्यानंतर त्यामधील पाणी ज्याप्रमाणे हलते तसे विहिरीमधील पाणी हलत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. या मागील कारण आता समोर आले असून नेमका हा काय प्रकार आहे जाणून घेऊयात...
ही घटना साधारणपणे २ ऑगस्टपासून चर्चेत आहे. ही विहीर गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वीरपारडा गावात असून ती सुमारे १८ फूट खोल आहे. स्थानिक शेतकरी प्रांजीवन सादरिया यांच्या मालकीच्या शेतात ही विहीर आहे. या शेताला लागूनच राष्ट्रीय महामार्ग आहे. ही चर्चेत असलेली विहीर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधण्यात आली आहे. मात्र या विहिरीची सध्या संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा असून इंटरनेटवरही विहिरीच्या व्हिडीओने धुमाकूळ घातलाय. जणू काही समुद्राच्या लाटाच विहिरीत तयार होत असल्यासारखे जोरजोरात या विहिरीमधील पाणी हलताना दिसतेय. त्याचवेळी याच परिसरामधील इतर विहिरींमधील पाणी मात्र शांत आहे.
काहींनी भूकंपांची शक्यता व्यक्त केली आहे तर काहींनी यामागे एखादी अलौकिक गोष्टी शंका व्यक्त केली होती. मात्र या विहिरीतील पाण्याच्या गूढ हालचालीसंदर्भात तज्ज्ञांचे मत वेगळेच आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना, जिल्हा भूशास्त्रज्ञ जे. एस. वधेरा यांनी, ‘ही भूकंपजन्य घटना नाही किंवा भूकंपाची चाहूलही नाही. गांधीनगर येथील भूकंपीय संशोधन संस्थेनेही (इन्स्टिट्यूट ऑफ सिसमोलॉजिकल रिसर्चने) परिसरात सक्रिय फॉल्टलाईन नसल्याचे सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते यामागील मुख्य कारण म्हणजे जोरदार पावसामुळे भूजल स्तर बदलत असतो. खडकांच्या छिद्रांमध्ये अडकलेली हवा बाहेर पडत असल्याने पाण्यात अशा लाटा तयार होत आहेत. रस्त्याजवळील वाऱ्याचा प्रभावही यात योगदान देऊ शकतो. याला वैज्ञानिकदृष्ट्या ‘वेल सीच’ विहिरीतील दोलन म्हणजेच विहिरीतील पाणी हलत राहण्याची क्रिया असे म्हणतात.