

लेह : लेह-लडाखच्या अतिशय थंड हवामानात उगवणारे ‘सी-बकथॉर्न’ (Sea Buckthorn) हे फळ सध्या आपल्या उत्कृष्ट पोषकमूल्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. केशरी रंगाची ही लहानशी बेरी दिसायला जरी सामान्य वाटत असली तरी त्यामध्ये असलेल्या पोषक तत्त्व आणि अँटिऑक्सिडंटस्मुळे ती आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.
सी-बकथॉर्नला अनेक ठिकाणी ‘लेह बेरी’ म्हणूनही ओळखले जाते. या फळापासून ज्यूस, चहा, जॅम आणि तेल यासारखी विविध उत्पादने तयार केली जातात. सी-बकथॉर्नमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि ‘बायोॲक्टिव्ह कंपाउंडस्’ आढळतात. संतुलित आहारात याचा समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. सी-बकथॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात, जे शरीराला ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून वाचवण्यास मदत करतात. या फळात असलेले फॅटी ॲसिटस् आणि पोषक घटक हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यामध्ये असलेल्या जीवनसत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक फॅटी ॲसिडस्च्या मुबलक प्रमाणामुळे या फळाला ‘सुपरफूड’चा दर्जा देण्यात आला आहे.
सी-बकथॉर्नचा वापर केवळ ताजे फळ खाण्यासाठीच केला जात नाही, तर त्याचा पोषक तत्त्वांनी भरपूर असलेला ज्यूसही आरोग्यप्रेमींमध्ये खूप लोकप्रिय आहे. याच्या पानांपासून आणि फळांपासून हर्बल चहा व जॅम बनवला जातो. याच्या बिया आणि फळांपासून काढलेले तेल त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.