

वॉशिंग्टन/टेक्सास : भविष्यात चंद्रावर मानवी वस्त्या वसवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. चंद्रावरील माती म्हणजेच लुनार रेगोलिथमध्ये हरभरा पिकवण्यासाठी शास्त्रज्ञांना यश आले आहे. टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी बुरशी आणि कंपोस्ट यांच्या मिश्रणाचा वापर करून चंद्रावरील निर्जीव मातीला सुपीक बनवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.
पृथ्वीवरील जमिनीच्या तुलनेत चंद्रावरील रेगोलिथमध्ये कोणतीही सेंद्रिय द्रव्ये किंवा सूक्ष्मजीव नसतात. उलट, त्यात ॲल्युमिनियम, तांबे आणि जस्त यांसारख्या विषारी धातूंचे प्रमाण जास्त असते. तसेच, या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. त्यामुळे तिथे पिके घेणे हे एक मोठे आव्हान होते. संशोधकांनी चंद्रावरील खऱ्या मातीच्या नमुन्यांवर आधारित सिम्युलंट (कृत्रिम माती) तयार केली. यावर त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग केले. व्हर्मीकंपोस्टचा वापर केला. रेड विगलर गांडुळांपासून तयार केलेले व्हर्मीकंपोस्ट या मातीत मिसळले. हे कंपोस्ट अन्न कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून तयार केले जाते. तसेच या मातीत आर्बस्क्युलर मायकोरायझल फंगी नावाची बुरशी मिसळली. ही बुरशी पृथ्वीवरील मातीत नैसर्गिकरीत्या आढळते.
संशोधक सारा सँटोस यांच्या मते, या मिश्रणामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. बुरशीमुळे मातीतील विषारी धातूंचा पिकांवर होणारा परिणाम कमी होतो. तसेच ही बुरशी मातीतील पोषक तत्वांचे वहन सुधारते आणि मातीचे कण एकत्र बांधून ठेवत धूप रोखण्यास मदत करते.
स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
जर चंद्रावर पिके घेणे शक्य झाले, तर अंतराळ वीरांना अन्नासाठी पृथ्वीवरून पुरवठा करण्यावर अवलंबून राहावे लागणार नाही, ज्यामुळे मोहिमेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.