

वॉशिंग्टन : निसर्गातील चार मूलभूत बलांपैकी (Fundamental forces) ‘गुरुत्वाकर्षण’ (Gravity) हे एक असे बल आहे, ज्याचा आपण रोजच्या जीवनात थेट अनुभव घेतो. याच बलामुळे आपले पाय जमिनीवर टिकून आहेत आणि सूर्य-मालिका आपल्या जागी स्थिर आहे. मात्र, इतके जवळचे असूनही शास्त्रज्ञांना अजूनही गुरुत्वाकर्षणाची अचूक ताकत निश्चित करता आलेली नाही. १९८० च्या दशकापासून शास्त्रज्ञांनी गुरुत्वाकर्षणाचे अचूक मूल्य मोजण्यासाठी डझनभराहून अधिक प्रयोग केले आहेत; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील अनेक प्रयोगांचे निष्कर्ष एकमेकांशी जुळत नाहीत.
गुरुत्वाकर्षण किती शक्तिशाली आहे, हे शोधणे इतके कठीण का आहे? गुरुत्वाकर्षण आपल्याला शक्तिशाली वाटते कारण आपण सतत पृथ्वीच्या अथांग गुरुत्वीय ओढीचा अनुभव घेत असतो. परंतु, दैनंदिन जीवनातील कोणत्याही दोन वस्तूंच्या दरम्यान किंवा प्रयोगशाळेत ठेवता येतील, अशा कोणत्याही दोन वस्तूंच्या दरम्यान असणारे गुरुत्वाकर्षण बल अत्यंत नगण्य असते.’नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी’चे भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन श्लामिंगर यांनी सांगितले की, “हे बल खूपच कमकुवत आहे आणि पृथ्वीच्या अवाढव्य गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर आपल्याला त्याचे मोजमाप करावे लागते.
प्रयोगशाळेत गुरुत्वाकर्षण मोजण्यासाठी, आम्हाला अशा दोन वस्तू वापराव्या लागतात ज्यांचे वस्तुमान अचूक माहीत आहे. या दोन वस्तूंना एकमेकांच्या जवळ आणून त्यांच्यातील सूक्ष्म बलाचे मोजमाप करावे लागते.’’ एप्रिल २०२६ मधील नवीन प्रयोग आणि निष्कर्ष नुकत्याच, एप्रिल २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, श्लामिंगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुत्वाकर्षणाची ताकद मोजण्यासाठी एक अचूक प्रयोग पुन्हा करून पाहिला. यावेळी त्यांना आधीच्या प्रयोगांपेक्षा वेगळे मूल्य मिळाले. या प्रयोगासाठी त्यांनी तब्बल १३ टन (१२ मेट्रिक टन) पाऱ्याचा वापर केला होता. परंतु, श्लामिंगर यांच्या मते, ‘‘एवढा मोठा साठा वापरूनही गुरुत्वीय क्षेत्रात झालेला बदल हा पृथ्वीच्या स्थानिक गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत केवळ दहा लाखावा भाग इतकाच होता.’’
या प्रयोगात टीमला गुरुत्वाकर्षणाचे जे मूल्य इतके मिळाले, जे मागील निकालापेक्षा काही अंशी कमी होते. सर्वसामान्यांसाठी तो फरक अतिशय किरकोळ वाटू शकतो; पण मोजमाप शास्त्राच्या दृष्टीने हा फरक खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण आहे. मानवी पेशींच्या वजनाइतके सूक्ष्म मोजमाप ‘जर्मन नॅशनल मेट्रोलॉजी इन्स्टिट्यूट’चे भौतिकशास्त्रज्ञ ख्रिश्चन रॉथलीटनर यांनी २०१७ मध्ये श्लामिंगर यांच्यासोबत गुरुत्वाकर्षणाच्या सर्व मोजमापांचा एक सर्वसमावेशक आढावा घेतला होता. या नवीन प्रयोगात ते थेट सामील नव्हते; परंतु या गुंतागुंतीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले: ‘‘हे अतिशय सूक्ष्म बल आपल्याला दशांश चिन्हानंतर ६ किंवा त्याहून अधिक घरांपर्यंत अचूकपणे मोजावे लागते. हे मोजमाप करणे म्हणजे साधारणपणे ७ मानवी पेशींचे वजन मोजण्याइतके अतिसूक्ष्म आणि आव्हानात्मक काम आहे.’’ याच अत्यंत सूक्ष्म स्वरूपामुळे, विज्ञान इतके प्रगत झाले असूनही गुरुत्वाकर्षणाचे एक निश्चित आणि अंतिम मूल्य शोधणे हे आजच्या घडीला जागतिक शास्त्रज्ञांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.