

वॉशिंग्टन : अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये रात्रीच्या वेळी दिसणार्या ‘भुतांच्या कंदिलां’चे रहस्य आता उलगडले आहे. अनेक दशकांपासून जंगलातून येणार्या अशा वर्तुळाकार गूढ प्रकाशाने स्थानिक लोकांना भयचकीत करून सोडले होते. आता संशोधकांनी म्हटले आहे की, हा प्रकाश छोट्या भूकंपांचा परिणाम आहे.
दक्षिण कॅरोलिनातील एका जुन्या रेल्वे रुळाजवळ प्रकाशाची रहस्यमय वर्तुळे दिसत असत. त्यामुळे तिथे हा समज पसरला होता की, एका महिलेने आपल्या पतीला रेल्वे अपघातात गमावले होते व तिचे भूत इथे हातात अनेक कंदिल घेऊन फिरते! याठिकाणी असा प्रकाश नेमका कधी सर्वप्रथम दिसला हे स्पष्ट नाही. मात्र, विसाव्या शतकाच्या मध्यापासूनचे उल्लेख आढळतात. याठिकाणी झाडा-झुडपातून निळ्या किंवा हिरवट अशा प्रकाशाची छोटी वर्तुळे दिसून येत असत. शीप आयलंड रोडच्या भागात हा तरंगता प्रकाश दिसे. तेथूनच हा रेल्वेचा जुना पूल जातो. कालौघात या भागात अनेक दंतकथाही निर्माण झाल्या. येथून जाताना विचित्र व मोठ्या आवाजाने मोटारीही हलतात, भुताटकीची द़ृश्ये दिसतात असे म्हटले जात होते. स्थानिक लोक सांगतात की, या भागातील घरांचे दरवाजे आपोआप बंद होतात, पावलांचे आवाज येतात, वस्तू आपोआप इकडून तिकडे जातात. मात्र, यू.एस. जिओलॉजिकल सर्व्हेमधील (यूएसजीएस) सिस्मॅलॉजिस्ट सुसान हॉग यांनी याबाबतचे नवे संशोधन केले आहे. या घटना एका दुर्मीळ भूगर्भीय हालचालींमुळे घडतात असे त्यांनी सांगितले. त्यांना ‘अर्थक्वेक लाईटस्’ असे म्हटले जाते. ‘यूएसजीएस’च्या माहितीनुसार या अर्थक्वेक लाईटस् म्हणजे चमकदार वर्तुळे किंवा ठिणग्या असतात. या भूकंपाच्या वेळी किंवा त्यानंतरच्या काळात लगेचच दिसतात. भूगर्भातून उत्सर्जित होणार्या काही वायूंचा हा परिणाम असतो, असे अनेक संशोधकांना वाटते. त्यामध्ये मिथेन व रॅडोनसारख्या वायूंचा समावेश होतो. सेस्मिक हालचाली वाढल्या की जमिनीतून असे वायू बाहेर पडतात. हलणारे दगड किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीने अशा ठिणग्या बनतात. जिथे हा प्रकाश दिसतो त्या भागात ऑगस्ट 1959 मध्ये 4 किलोमीटरच्या भागात 4.4 मॅग्निट्यूडचा भूकंप झाला होता. त्यानंतर तिथे वारंवार छोटे भूकंप होत गेले. हलणार्या मोटारी, वस्तूंच्या हालचाली यांचे कारणही असे छोटे भूकंपच आहेत. याबाबतच्या संशोधनाची माहिती सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.