

बार्सिलोना : दीर्घायुष्य कोणाला नको असते? जवळपास प्रत्येकाला हवे असते. याच धर्तीवर वैज्ञानिकांनी नुकतेच एका 117 वर्षांच्या महिलेच्या डीएनएचा अभ्यास केला, त्यावेळी या संशोधनातून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या. शरीरातील मायक्रोबायोम व जनुकांवर या सर्व गोष्टी आधारित असतात, असे त्यात स्पष्ट झाले. त्यानुसार दीर्घायुष्यासाठी आपली जीवनशैली, आपला आहार कसा असावा, यावर आता संशोधक अधिक सखोल अभ्यास करत आहेत.
असे समोर आले आहे की तिची अद्वितीय जनुके आणि आरोग्यदायी जीवनशैली तिच्या असाधारण दीर्घायुष्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत होती. मारिया ब्रान्यास मोरेरा ही स्पेनची रहिवासी जगातील सर्वात वृद्ध महिला होती. तिने पहिले महायुद्ध आणि स्पॅनिश गृहयुद्ध यांसारख्या ऐतिहासिक घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. ऑगस्ट 2024 मध्ये वयाच्या 117 व्या वर्षी तिचे निधन झाले. तिची मुलगी रोजा मोरेट यांनी सांगितले की, तिची आई कधीही गंभीर आजारी पडली नाही आणि तिची स्मरणशक्ती, श्रवणशक्ती आणि द़ृष्टी शेवटच्या दिवसांमध्येच क्षीण झाली होती.
बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकांनी मारिया ब्रान्यास मोरेरा यांच्या मायक्रोबायोम आणि डीएनएवर संशोधन केले. या संशोधनातून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले. संशोधकांना असे आढळले की तिच्या शरीरातील मायक्रोबायोम एका लहान मुलासारखे होते. याशिवाय, तिची जनुके देखील बरीच वेगळी होती, ज्यामुळे तिचे वय सुमारे 17 वर्षांनी कमी झाले होते. म्हणजेच, तिच्या शरीराचे वय 117 नसून सुमारे 100 वर्षे होते. पण, आरोग्यदायी जीवनशैलीमुळे तिचे वय 17 वर्षांनी वाढले. मारियाच्या शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल, उत्कृष्ट रक्त शर्करा पातळी आणि आरोग्यदायी जीवनशैली होती. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की याच कारणामुळे ती इतकी वर्षे निरोगी राहिली. मारियाच्या डीएनए अभ्यासातून मिळालेली माहिती वृद्धत्वविरोधी औषधांमध्ये मोठे यश मिळवून देऊ शकते, अशी वैज्ञानिकांची आशा आहे. याशिवाय, कोणते अन्न दीर्घायुष्यासाठी मदत करू शकते हे देखील या संशोधनातून कळेल, असा त्यांचा दावा आहे.