Rare Shark Species | जमिनीवर ‘चालणारा’ अनोखा शार्क शोधण्यात यश

पापुआ न्यू गिनीच्या समुद्रात लागला शोध
Rare Shark Species |
Rare Shark Species | जमिनीवर ‘चालणारा’ अनोखा शार्क शोधण्यात यश
Published on
Updated on

पोर्ट मोरेस्बी : खगोलशास्त्रज्ञ आणि सागरी जीवशास्त्रज्ञांच्या एका पथकाला पापुआ न्यू गिनीच्या किनारपट्टीवर शार्क माशाची एक अतिशय दुर्मीळ आणि नवीन प्रजाती शोधण्यात यश आले आहे. या शार्कचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा मासा चक्क आपल्या फिन्सचा वापर पायांसारखा करून समुद्राच्या तळाशी आणि कमी पाण्याच्या भागात 'चालू' शकतो.

वैज्ञानिक भाषेत याला 'हेमिसिलियम डजनी' (Hemiscyllium dudgeonae) असे नाव देण्यात आले आहे. हा मासा प्रामुख्याने 'इपॉलेट शार्क' (Epaulette Shark) किंवा कार्पेट शार्कच्या गोटातील आहे. ऑस्ट्रेलियाच्या 'युनिव्हर्सिटी ऑफ द सनशाईन कोस्ट'च्या पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टीन डजन या पापुआ न्यू गिनी येथील मिलणे बे भागात रात्रीच्या वेळी एका ज्ञात शार्क प्रजातीचा शोध घेत होत्या. त्याच वेळी त्यांच्या हाती सुमारे अडीच फूट लांबीचा एक वेगळाच मासा लागला. त्यांनी हा मासा बोटीवर आणल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरल विद्यार्थिनी जेस ब्लेकवे यांच्या लक्षात आले की, या माशाच्या शरीरावरील नक्षी आम्ही शोधत असलेल्या नेहमीच्या शार्कसारखी नाही. या नव्या शार्कच्या तपकिरी शरीरावर पांढऱ्या रेषा आणि छोटे ठिपके होते, जे मोर्स कोड किंवा ब्रेल लिपीसारखे दिसत होते.

नंतर ऑस्ट्रेलियातील प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या डीएनए आणि जनुकीय चाचणीनंतर, हा जगातील चालणाऱ्या शार्कचा संपूर्णपणे एक नवीन प्रकार (१० वी प्रजाती) असल्याचे शिक्कामोर्तब झाले. २०१३ नंतर या समूहात शोधली गेलेली ही पहिलीच नवीन प्रजाती आहे. पापुआ न्यू गिनीमधील स्थानिक रहिवासी या माशाला 'कादेदेकेदेवा' या नावाने ओळखतात. याचा ढोबळमानाने अर्थ 'आळशी शार्क' किंवा 'कुत्रा शार्क' असा होतो, कारण त्याची चालण्याची पद्धत अतिशय संथ आणि चार पायांच्या प्राण्यासारखी असते. हा मासा मानवांसाठी पूर्णपणे निरुपद्रवी आहे. या नव्या शोधाच्या आनंदासोबतच शास्त्रज्ञांनी चिंताही व्यक्त केली आहे. हे चालणारे शार्क खूप मर्यादित क्षेत्रात राहतात आणि जास्त दूर प्रवास करू शकत नाहीत. त्यामुळे हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान आणि किनारपट्टीवरील मासेमारीमुळे त्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला असून, ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असू शकते, असा इशारा संशोधकांनी 'जर्नल ऑफ द ओशन सायन्स फाउंडेशन'मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात दिला आहे.

हा शार्क कसा ‘चालतो’?

इतर मोठ्या शार्क माशांसारखा हा खुल्या आणि अथांग समुद्रात पोहत नाही, तर तो प्रामुख्याने उथळ किनारपट्टी आणि प्रवाळांच्या खाचखळग्यांमध्ये राहतो. ओहोटीच्या वेळी जेव्हा समुद्राचे पाणी ओसरते आणि प्रवाळांचे खडक उघडे पडतात, तेव्हा हा शार्क आपल्या चारही पर किंवा पंखांचा (फिन्स) वापर पायांसारखा करून एका खडकावरून दुसऱ्या खडकावर किंवा पाण्याच्या डबक्यात चालत जातो. अत्यंत कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातही हा मासा स्वतःच्या हृदयाचे ठोके मंद करून कित्येक तास जिवंत राहू शकतो. या क्षमतेमुळे तो इतर भक्षकांपासून स्वतःचा बचाव करतो आणि छोट्या खेकड्यांसारख्या जीवांची शिकार करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news