

वॉशिंग्टन : जगभरात अनेक रंग आहेत, जे आपल्याला वेगवेगळी अनुभूती देतात. मात्र, संशोधकांनी आता असा रंग शोधला आहे, जो आजवर कधीच, कोणीच पाहिलेला नव्हता. कॅलिफोर्निया व्हीव्हीच्या संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हा रंग शोधल्याचा दावा याप्रसंगी केला आहे. संशोधकांनी डोळ्यांत लेसर प्रकाश सोडत रेटिनाच्या काही खास कोशिकांना प्रवर्तित करत त्यांची द़ृष्टी आणखी प्रखर केली आणि त्याची पाहण्याची क्षमता आणखी वृद्धिंगत केली. त्यानंतर हा नवा रंग पाहण्यात आला.
याबाबतचा शोधनिबंध सायन्स अॅडव्हान्सेस या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला असून, तो द़ृष्टीक्षेत्रात पूर्ण चंद्राच्या आकाराच्या सुमारे दुप्पट असलेल्या एका रंगाच्या ठिपक्याच्या रूपात दिसतो. हा रंग डोळ्यांनी नैसर्गिकरीत्या पाहता येणार्या रंगांच्या श्रेणीत येत नाही. कारण, या प्रयोगात केवळ एम कोन पेशी (मध्यम-तरंगलांबी संवेदन करणार्या पेशी) सक्रिय केल्या जातात आणि नैसर्गिक प्रकाश अशाप्रकारे त्या पेशींना एकट्यांना उत्तेजित करू शकत नाहीत.
चाचणीदरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमानेच एकूण पाच जणांना हा रंग कसा आहे, ते दाखवण्यात आले. यातील काहींनी तो निळा-हिरवा असल्याचे सांगितले. मात्र, संशोधकांनी केवळ निळा किंवा हिरवा असे सांगत त्या रंगाची बिनचूक व्याख्या करता येत नसल्याचे यावेळी नमूद केले. आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत होते की, हा रंग पूर्वी कधीही न पाहिलेला असेल; पण मेंदू त्यावर कसा प्रतिसाद देईल, हे माहीत नव्हते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर रेन एनजी यांनी याविषयी बोलताना नमूद केले. संशोधकांनी त्या रंगाची कल्पना यावी म्हणून एक चौकट शेअर केली आणि त्या रंगाला ‘ओलो’ असे नाव दिले; पण त्यांनी हेही स्पष्ट केले की, हा रंग प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी लेझरद्वारे रेटिनावर विशेष प्रकारे परिणाम करणे आवश्यक आहे. केवळ पाहून त्याचा खरा अनुभव येत नाही.