Cosmic Matter Discovered | आकाशगंगांमधील महाकाय पोकळीत ‘गहाळ झालेले’ वैश्विक द्रव्य सापडले!

 Cosmic Matter Discovered |
Cosmic Matter Discovered | आकाशगंगांमधील महाकाय पोकळीत ‘गहाळ झालेले’ वैश्विक द्रव्य सापडले!
Published on
Updated on

वाॅशिंग्टन : अब्जावधी वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञांना कोड्यात टाकणाऱ्या एका मोठ्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे. आपल्या विश्वातील आकाशगंगांमध्ये जेवढे सामान्य द्रव्य असायला हवे होते, त्यापेक्षा ते खूपच कमी का दिसत होते? या प्रश्नाचे उत्तर आता शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. आकाशगंगांमधील अथांग आणि रिकाम्या पोकळीत हे गहाळ झालेले द्रव्य दडून बसल्याचे नवीन संशोधनातून समोर आले आहे.

‘एमआयटी' मधील संशोधकांच्या नेतृत्वाखालील ‘CHIME/FRB कोलॅबोरेशन' च्या टीमने हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. यासाठी त्यांनी 'फॅस्ट रेडिओ बर्स्ट्स' (FRBs) ची निरीक्षणे आणि आकाशगंगांच्या स्थानांची मोजमापे एकत्र करून एक नवी पद्धत विकसित केली. २१ जुलै रोजी 'फिजिकल रिव्ह्यू लेटर्स' या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, हे गायब झालेले द्रव्य प्रत्यक्षात आकाशगंगांच्या अंतर्भागातून बाहेर फेकले गेले होते आणि ते दोन आकाशगंगांमधील रिकाम्या जागेत पसरले होते. आकाशगंगांमधील ब्लॅक होलचे शक्तिशाली जेटस्‌ आणि सुपरनोव्हा (ताऱ्यांचे होणारे भीषण स्फोट) यांसारख्या अत्यंत हिंसक खगोलीय घटनांमुळे हे द्रव्य बाहेर फेकले गेले.

यावरून या घटना पूर्वी मानल्या जात होत्या त्यापेक्षा कितीतरी पट अधिक ऊर्जावान आहेत, असा स्पष्ट संकेत मिळतो. शास्त्रज्ञांच्या गणनेनुसार, 'बिग बँग' स्फोटानंतर लगेचच विश्वातील एकूण द्रव्यांपैकी १७ टक्के सामान्य द्रव्य (Ordinary Matter) बनले ज्यापासून आपण, आपले ग्रह, तारे आणि सर्व दृश्य आकाशगंगा बनल्या आहेत. तसेच ८३ टक्के डार्क मॅटर बनले. हा एक रहस्यमय घटक, जो गुरुत्वाकर्षण बल निर्माण करतो; पण प्रकाशाशी कोणताही संपर्क साधत नाही. वैज्ञानिक गणितानुसार आजच्या दृश्य विश्वातही सामान्य द्रव्याचे हेच प्रमाण दिसायला हवे होते. परंतु, सर्व आकाशगंगांमधील दृश्य द्रव्याची बेरीज केली असता, ती अपेक्षित प्रमाणाच्या फक्त १० टक्के (दहावा भाग) एवढीच भरत होती.

उरलेले ९० टक्के द्रव्य दोन आकाशगंगांमधील अथांग पोकळीत अत्यंत विरळ स्वरूपात पसरले असावे, असा सिद्धांत दीर्घकाळापासून मांडला जात होता; पण इतक्या विरळ स्वरूपातील द्रव्य शोधणे अत्यंत कठीण होते. या गहाळ द्रव्याचा शोध घेण्यासाठी CHIME/FRB टीमने ‘फॅस्ट रेडिओ बर्स्ट्स' (FRBs) चा वापर केला. २००७ मध्ये शोधण्यात आलेले FRBs हे काही मिलिसेकंद टिकणारे; पण अत्यंत तेजस्वी रेडिओ लहरींचे झोत असतात. अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगांमधून पृथ्वीकडे प्रवास करताना या रेडिओ लहरी वाटेत येणाऱ्या द्रव्यामधून पार होतात. त्यामुळे ज्या द्रव्यातून त्या जातात, त्याची स्वाक्षरी किंवा छाप या लहरींवर उमटते. एका अर्थी या लहरी ब्रह्मांडाच्या ‘एक्स-रे स्कॅन' प्रमाणे काम करतात. याच तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी अंतराळातील या अदृश्य द्रव्याचा शोध यशस्वीरीत्या लावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news