

वॉशिंग्टन : गेल्या अनेक दशकांपासून भूवैज्ञानिकांना एका प्रश्नाने सतावले होते : पृथ्वीवरील हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि सल्फर यांसारखी हलकी मूलद्रव्ये नेमकी गेली कुठे? सूर्य आणि अवकाशातून आलेल्या उल्कांच्या तुलनेत पृथ्वीवर या मूलद्रव्यांचे प्रमाण 99 टक्क्यांहून कमी आहे. आता शास्त्रज्ञांच्या एका गटाने या गूढ प्रश्नाचे उत्तर शोधल्याचा दावा केला आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, ही गायब झालेली मूलद्रव्ये पृथ्वीच्या अतिशय खोलवर असलेल्या ‘इनर कोअर’ (घन गाभा) मध्ये दडलेली असू शकतात. पृथ्वीच्या केंद्रात 360 गिगापास्कल इतका प्रचंड दाब असतो (जो वातावरणीय दाबाच्या 36 लाख पट जास्त आहे). या टोकाच्या दाबाखाली लोखंड एका वेगळ्या रूपात वागते, ज्याला ‘इलेक्ट्राइड’ म्हणतात. हे धातूचे एक असे दुर्मीळ रूप आहे जे हलक्या मूलद्रव्यांना स्वतःकडे खेचून घेऊ शकते.
शांघाय येथील ‘सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’चे भौतिकशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे सह-लेखक डक यंग किम म्हणतात की, ‘मूलद्रव्यांचे हे शोषण गेल्या दोन अब्ज वर्षांपासून हळूहळू होत असावे आणि आजही ते सुरू असू शकते.’ यामुळेच भूकंपाच्या लाटांचा अभ्यास करताना पृथ्वीच्या केंद्राची घनता ही केवळ धातूच्या अपेक्षेपेक्षा 5 ते 8 टक्क्यांनी कमी का भरते, याचा उलगडा होतो. केवळ पृथ्वीचे रहस्य उलगडण्यासाठीच नाही, तर मानवी प्रगतीसाठीही ‘इलेक्ट्राइडस्’ अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. खत निर्मिती: जपानमधील संशोधकांनी अमोनिया (खताचा मुख्य घटक) तयार करण्यासाठी एका इलेक्ट्राइडचा वापर केला आहे. यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा 20% ऊर्जा वाचते.
औषध निर्मिती: रसायनशास्त्रज्ञ आता अशा नवीन इलेक्ट्राइडस्चा शोध घेत आहेत, ज्यामुळे औषधांची निर्मिती स्वस्त आणि अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने होऊ शकेल. उत्तम उत्प्रेरक : इलेक्ट्राइडस्मधील इलेक्ट्रॉन इतर रेणूंना सहज दान केले जाऊ शकतात, ज्यामुळे कठीण रासायनिक अभिक्रिया जलद आणि सुलभ होतात. सध्या शास्त्रज्ञांसमोर असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ शोधणे आणि ते नेमके कधी तयार होतात, याचे रासायनिक नियम समजून घेण्याचे मोठे आव्हान आहे. हे संशोधन केवळ पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दलच नाही, तर भविष्यातील हरित तंत्रज्ञानासाठीही अत्यंत मोलाचे ठरणार आहे.