

कॅनबेरा : भूगर्भशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील सर्वात मोठ्या लोहखनिजाच्या साठ्याच्या निर्मितीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञांना असे दिसून आले आहे की, हा साठा पूर्वीच्या अंदाजापेक्षा तब्बल एक अब्ज वर्षांनंतर तयार झाला आहे. हा विशाल साठा ऑस्ट्रेलियाच्या हॅमर्सले प्रांतात स्थित आहे.
विविध अंदाजानुसार, जमिनीखालील या साठ्याचे प्रमाण सुमारे 55 अब्ज मेट्रिक टन इतके आहे. या लोहखनिजाची किंमत थक्क करणारी आहे. सध्याच्या बाजारभावावर आधारित याचे सैद्धांतिक मूल्य 5.7 ट्रिलियन डॉलर (सुमारे 518 लाख कोटी रुपये) पेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मोठा लोहखनिज निर्यातदार देश असून, त्यांच्या एकूण निर्यातीपैकी 96 टक्के हिस्सा हा उच्च दर्जाचा ’हेमेटाइट’ प्रकारचा असतो, जो प्रामुख्याने याच प्रदेशातून मिळवला जातो. ’प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
यानुसार, हा साठा 1.4 ते 1.1 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या नवीन शोधामुळे या साठ्याचा निर्मिती काळ पूर्वी सांगितलेल्या काळापेक्षा एक अब्ज वर्षे पुढे ढकलला गेला आहे. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे भूगर्भशास्त्रज्ञ लियाम कोर्टनी-डेविस (युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डर) यांनी सांगितले की, या लोह साठ्यांचा संबंध एका मोठ्या भूवैज्ञानिक उलथापालथीच्या काळाशी आहे.
या हालचालींतून निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे पिलबारा क्षेत्रात अब्जावधी टन लोहसमृद्ध खडकांच्या निर्मितीला चालना मिळाली असावी. हा नवीन निष्कर्ष जुन्या मॉडेल्सना पूर्णपणे नाकारत नाही. संशोधकांना 2.2 ते 2.0 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या खनिज घटनेचेही पुरावे मिळाले आहेत. मात्र, तो जुना साठा बहुधा काळाच्या ओघात नष्ट झाला असावा. आज जो प्रचंड साठा सुरक्षित उरला आहे, तो प्रामुख्याने 1.4 ते 1.1 अब्ज वर्षांपूर्वीच्या तुलनेने नवीन कालखंडातील आहे.