31 Mysterious Quasars | विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील ३१ गूढ ‘क्वासार्स’चा शोध

‘युक्लिड’ स्पेस टेलिस्कोपची कमाल!
31 Mysterious Quasars |
31 Mysterious Quasars | विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील ३१ गूढ ‘क्वासार्स’चा शोध
Published on
Updated on

पॅरिस : युरोपियन स्पेस एजन्सीच्या ‘युक्लिड’ स्पेस टेलिस्कोपला अंतराळ संशोधनात मोठे यश आले आहे. या टेलिस्कोपने विश्वाच्या निर्मितीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील ३१ पूर्वी माहीत नसलेले ‘क्वासार्स’ शोधून काढले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये आतापर्यंत शोधण्यात आलेल्या दोन सर्वात जुन्या क्वासार्सचाही समावेश आहे.

‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या जर्नलमध्ये ६ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या या शोधामुळे, त्या आदिम काळातील ज्ञात क्वासार्सची संख्या आता दुप्पट झाली आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या अभ्यासातील एक सर्वात मोठे रहस्य उलगडण्यास यामुळे मदत होणार आहे. 'बिग बँग' म्हणजेच महाविस्फोटानंतर एवढ्या कमी वेळात 'सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल्स' (अवाढव्य कृष्णविवर) इतके महाकाय कसे झाले? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आता खगोलशास्त्रज्ञांना सोपे जाणार आहे. ‘‘या अत्यंत आकर्षक खगोलीय घटकांना मूलभूत पातळीवर समजून घेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे,’’ असे युक्लिड टीममधील ईएसएचे (ESA) रिसर्च फेलो अँटोनियो ला मार्का यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दूरवरच्या अंतराळाचे सर्वेक्षण करत असताना युक्लिड टेलिस्कोपला हे यश आले. या शोधामध्ये १२ क्वासार्सचे रेडशिफ्ट ७ किंवा त्याहून अधिक आहे. याचा अर्थ त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी १३ अब्ज वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आहे. हा काळ विश्वाच्या सुरुवातीच्या पहिल्या ७७ कोटी वर्षांमधील आहे. ७.७७ आणि ७.६९ रेडशिफ्ट असलेले दोन सर्वात जुने क्वासार्स मिळाले आहेत. हे आजवर शोधले गेलेले सर्वात प्राचीन क्वासार्स ठरले असून, ते 'बिग बँग'नंतर अवघ्या ६७ कोटी वर्षांनी चमकले होते. म्हणजेच, जेव्हा विश्वाचे वय आजच्या वयाच्या केवळ ५ टक्के होते, त्या काळातील हे क्वासार्स आहेत. या ऐतिहासिक शोधामुळे आता युनिव्हर्सच्या सुरुवातीच्या काळातील ब्लॅक होल्सच्या निर्मितीचा प्रवास समजून घेणे शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे.

‘क्वासार्स’ म्हणजे काय?

क्वासार्स हे विश्वातील सर्वात तेजस्वी घटकांपैकी एक मानले जातात. जेव्हा गॅस आणि धूलिकण एखाद्या आकाशगंगेच्या (Galaxy) केंद्रस्थानी असलेल्या सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलमध्ये वेगाने चक्राकार फिरत आत जातात, तेव्हा ते प्रचंड गरम होतात. या प्रक्रियेतून एवढी अफाट ऊर्जा उत्सर्जित होते की, तिची चमक संपूर्ण आकाशगंगेपेक्षाही जास्त असते. या नवीन संशोधनात आढळलेल्या दोन सर्वात प्राचीन क्वासार्सपैकी प्रत्येक क्वासार हा तब्बल ‘दहा लाख कोटी’ (Trillion) सूर्यांच्या प्रकाशाएवढा तेजस्वी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news