

वेलिंग्टन (न्यूझीलंड) : आपण देवमाशांना समुद्रातील विशाल आणि शांत जीव म्हणून ओळखतो. पण, लाखो वर्षांपूर्वी त्यांचे काही पूर्वज आकाराने लहान, विचित्र आणि अत्यंत हिंस्र होते. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्यावर 25 दशलक्ष वर्षे जुन्या जीवाश्माच्या अपघाती शोधाने शास्त्रज्ञांना देवमाशांच्या एका पूर्णपणे नवीन आणि दुर्मीळ प्रजातीची ओळख करून दिली आहे, ज्यामुळे देवमाशांच्या उत्क्रांतीचे रहस्य उलगडणार आहे.
संशोधकांनी या प्रजातीला अधिकृतपणे ‘जान्जुसेटस डलार्डी’ असे नाव दिले. या जीवाचे डोळे टेनिसबॉलच्या आकाराचे आणि बाहेर आलेले होते, ज्यामुळे तो एखाद्या कार्टूनमधील पात्रासारखा दिसत होता. आजच्या देवमाशांप्रमाणे विशाल नसलेला हा जीव एका लहान बेडमध्ये सहज मावू शकला असता. हा जीव जरी गोंडस दिसत असला तरी त्याचे दात अत्यंत तीक्ष्ण होते आणि तोंड शार्क माशासारखे होते, ज्यामुळे तो एक धोकादायक शिकारी असल्याचे स्पष्ट होते. म्युझियम्स व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ क्युरेटर आणि या शोधनिबंधाचे सह-लेखक एरिक फिट्झगेराल्ड सांगतात, तो दिसायला गोंडस असला तरी धोकादायक होता. तो एखाद्या पोकेमॉन, व्हेल आणि सील यांचे विचित्र मिश्रण वाटत असला, तरी तो पूर्णपणे वेगळा आणि समुद्रातील एक प्रभावी शिकारी होता.
या देवमाशाच्या कवटीचा काही भाग, ज्यामध्ये कानाची हाडे आणि दातांचा समावेश आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यातील जीवाश्मांसाठी प्रसिद्ध असलेल्या जॅन जॅक समुद्रकिनार्यावर कवठीचा भाग सापडला. फिट्झगेराल्ड यांच्या मते, हा परिसर देवमाशांच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. शास्त्रज्ञांचे मते, ‘जान्जुसेटस डलार्डी’ हा ‘मॅमॅलोडोंटिड्स’ नावाच्या गटातील चौथी प्रजाती आहे. हे देवमासे फक्त ओलिगोसीन युगात (सुमारे 3.4 ते 2.3 कोटी वर्षांपूर्वी) अस्तित्वात होते. आजचे मोठे देवमासे (उदा. हंपबॅक आणि ब्लू व्हेल) समुद्रातील लहान जीव गाळून खातात. पण त्यांचे हे पूर्वज, ‘जान्जुसेटस डलार्डी’सारखे, आपल्या शक्तिशाली जबड्याने आणि तीक्ष्ण दातांनी शिकार करत असत. हा शोध आजच्या विशाल बालीन देवमाशांपर्यंत पोहोचणार्या उत्क्रांतीच्या साखळीतील एक महत्त्वाचा आणि सुरुवातीचा टप्पा दर्शवतो.