

लंडन : आपण किती वर्षे जगू, यापेक्षा आपण किती वर्षे निरोगी जगू, हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा झाला आहे. ब्रिटनमधील वाढती लठ्ठपणाची समस्या आणि दीर्घकालीन आजारांच्या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी आता एका विशिष्ट सूत्राच्या आधारे तुम्ही किती वर्षे आजारमुक्त जगू शकता, याचा अचूक अंदाज वर्तवणारा कॅल्क्युलेटर तयार केला आहे.
इंग्लंडमधील एका वैज्ञानिक अहवालानुसार, व्यक्तीचे लिंग, वय आणि ती ज्या भागात राहते, यावरून तिच्या निरोगी आयुष्याचा अंदाज लावता येतो. श्रीमंत विरुद्ध गरीब दरी आयुष्यावर प्रभाव टाकते. इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत भागात राहणार्या महिलांच्या तुलनेत, सर्वात गरीब भागात राहणार्या महिलांना 20 वर्षे आधीच गंभीर आजार जडतात, असे या अहवालात म्हटले आहे. सर्वात गरीब भागातील महिलांचे सरासरी निरोगी आयुष्य फक्त 50.5 वर्षे आहे. याउलट, श्रीमंत भागातील महिला सरासरी 70 वर्षे आणि 10 महिने निरोगी आयुष्य जगतात.
पुरुषांच्या बाबतीतही हेच चित्र असून, गरीब भागातील पुरुष केवळ 51 वर्षे निरोगी जगू शकतात, जे श्रीमंत भागातील पुरुषांच्या तुलनेत 19 वर्षांनी कमी आहे. अभ्यासनुसार केवळ वयच नाही, तर इतर घटकही मानवी आयुष्यावर परिणाम करत असतात. राहण्याचे ठिकाण, त्या ठिकाणच्या स्थानिक सोयी-सुविधा आणि सामाजिक आधार याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. जीवनशैली ही देखील आरोग्य आणि आयुष्यावर परिणाम करत असते. मद्यपान, धूम्रपान, आहार आणि व्यायामाच्या सवयी मानवी जीवनावर प्रभाव टाकतात. वांशिकता, अपंगत्व, सामाजिक एकाकीपणा आणि आर्थिक परिस्थिती हे सामाजिक घटकही मानवी आयुष्यात महत्त्वाचे ठरतात.
शास्त्रज्ञांच्या मते, तुमच्या भागाची आर्थिक स्थिती काहीही असली, तरी वैयक्तिक स्तरावर काही बदल करून तुम्ही तुमचे निरोगी आयुष्य वाढवू शकता. त्यामध्ये योग्य आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अति-प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे. आहारात फळेक आणि पालेभाज्यांचा समावेश वाढवणे, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो, असे शास्त्रज्ञ सांगतात.