

लंडन : आजकाल एअर कंडिशनर (एसी) ही लोकांची गरज बनत चालली आहे; पण त्याचे वाढते वीज बिल सर्वसामान्यांचे बजेट बिघडवून टाकते. याच पार्श्वभूमीवर, शास्त्रज्ञ आता अशा एका तंत्रज्ञानावर काम करत आहेत, जे भविष्यात कूलिंगची (थंड करण्याची) पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकते. वैज्ञानिक सध्या 'सॉलिड-स्टेट कूलिंग सिस्टम' विकसित करत आहेत, ज्यामध्ये ना कंप्रेसरची गरज भासणार आहे ना कोणत्याही कूलिंग गॅसची.
सध्या वापरात असलेले जवळपास सर्वच एअर कंडिशनर रेफ्रिजरेंट गॅस आणि कंप्रेसरच्या साहाय्याने काम करतात. मात्र, सॉलिड-स्टेट कूलिंग सिस्टमची कार्यपद्धत यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या तंत्रज्ञानात गॅसचे द्रवात आणि पुन्हा द्रवाचे गॅसमध्ये रूपांतर करून कूलिंग केले जात नाही. त्याऐवजी, काही विशिष्ट घन पदार्थांवर इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड किंवा मेकॅनिकल प्रेशर (यांत्रिक दाब) टाकला जातो. यामुळे त्या घन पदार्थांच्या तापमानात बदल होतो आणि थंड हवा निर्माण होते. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने 'कॅलोरिक इफेक्टस्'वर काम करते. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा विशिष्ट घन पदार्थांवर बाह्य दाब किंवा क्षेत्र लागू केले जाते, तेव्हा ते गरम किंवा थंड होतात. या गुणधर्माचा वापर करूनच हा नवीन कूलिंग सिस्टम विकसित केला जात आहे. सध्या आपण जे एसी वापरतो, त्यामध्ये असणारे हायड्रोफ्लोरोकार्बन (HFC) गॅसेस आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत घातक असतात.
हे गॅसेस कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान कित्येक पटीने वाढवण्यास कारणीभूत ठरतात. या गॅसची गळती झाल्यास पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. सॉलिड-स्टेट कूलिंग तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारच्या रेफ्रिजरेंट गॅसचा वापर होत नसल्याने ही समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते. अहवालानुसार, प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा 'कोएफिसिएंट ऑफ परफॉर्मेंस' (COP) तब्बल १० पर्यंत नोंदवला गेला आहे. याउलट, आपल्या घरातील सामान्य एसीचा 'सीओपी' (COP) साधारणपणे ३ ते ५.५ च्या दरम्यान असतो. याचा अर्थ हे नवीन तंत्रज्ञान सध्याच्या एसीपेक्षा दुप्पट ऊर्जा कार्यक्षम (Energy Efficient) ठरू शकते, ज्यामुळे विजेची मोठी बचत होईल. मात्र, हे उत्कृष्ट प्रदर्शन सध्या केवळ नियंत्रित प्रयोगशाळेच्या वातावरणातच पाहायला मिळाले आहे.
हा एसी बाजारात कधी येणार?
सध्या हा एसी सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध झालेला नाही. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेबाहेर, म्हणजेच वास्तविक आणि बदलत्या वातावरणात तितके प्रभावी ठरते की नाही, यावर अद्याप संशोधन सुरू आहे. तसेच, वारंवार दाब सहन करणाऱ्या घन पदार्थांची मजबुती आणि ते दीर्घकाळ टिकण्याबाबतच्या आव्हानांवर शास्त्रज्ञ सध्या काम करत आहेत. या आव्हानांवर मात केल्यानंतरच हे तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनासाठी बाजारात आणले जाईल.