Diving Suit for Cockroaches | शास्त्रज्ञांनी झुरळांसाठी बनवला ‘डायव्हिंग सूट’

Diving Suit for Cockroaches |
Diving Suit for Cockroaches | शास्त्रज्ञांनी झुरळांसाठी बनवला ‘डायव्हिंग सूट’
Published on
Updated on

टोकियो : भूकंप किंवा एखाद्या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आता थेट ‘झुरळांची’ मदत घेतली जाणार आहे. शास्त्रज्ञांनी या झुरळांसाठी एक खास आणि अतिशय लहान ‘डायव्हिंग सूट’ तयार केला आहे. या अनोख्या तंत्रज्ञानामुळे या झुरळांचे रूपांतर हाय-टेक ‘शोध व बचाव सायबॉर्ग’ (Search-and-Rescue Cyborgs) म्हणजेच अर्ध-जैविक आणि अर्ध-यांत्रिक जीवांमध्ये झाले आहे.

यापूर्वीही शास्त्रज्ञांनी झुरळांच्या लहान पाठीवर बसणारे सेन्सर्स लावून त्यांचा शोधकार्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ढिगाऱ्याखालच्या पाण्यात किंवा ओलसर चिखलात हे सेन्सर्स निकामी होत असत. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी झुरळांसाठी थ्री-डी प्रिंटेड वॉटरप्रूफ ‘डायव्हिंग सूट’ तयार केला आहे. हा सूट झुरळाच्या पाठीवरील नाजूक इलेक्ट्रॉनिक्स आणि बॅटरीचे पाण्यापासून पूर्ण संरक्षण करतो. त्यामुळे आता हे झुरळ पाण्याखालून किंवा अत्यंत दमट आणि चिखलमय जागेतूनही सहज मार्ग काढू शकतात. झुरळे अत्यंत अरुंद आणि छोट्या फटींमधूनही सहज जाऊ शकतात, जिथे मानव किंवा मोठे रोबो पोहोचू शकत नाहीत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि अन्नाशिवायही झुरळे बऱ्याच काळासाठी जिवंत राहू शकतात. त्यामुळे या कार्यासाठी झुरळांचाच वापर करण्यात आला आहे. या झुरळांच्या पाठीवर बसवलेल्या यंत्रणेद्वारे शास्त्रज्ञ त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकतात. या सूटमध्ये लहान कॅमेरे, मायक्रोफोन आणि हवेचा दर्जा तपासणारे सेन्सर्स बसवणे शक्य आहे. जेव्हा हे झुरळ ढिगाऱ्याखाली किंवा भुयारांमध्ये पाठवले जातील, तेव्हा तेथील अडकलेल्या व्यक्तींचा आवाज किंवा त्यांचे लोकेशन हे सेन्सर्स थेट नियंत्रण कक्षात पाठवतील. नैसर्गिक आपत्ती किंवा कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हे अनोखे ‘सायबॉर्ग झुरळ’ भविष्यात अत्यंत प्रभावी आणि स्वस्त माध्यम ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news