

तोंडाचे आरोग्य केवळ चमकणार्या दातांवर अवलंबून नसून त्याचा थेट संबंध आपल्या हिरड्यांशी असतो. हिरड्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी आपण जे अँटिबॅक्टेरियल पदार्थ वापरतो, ते तोंडातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियांना नष्ट करतात. मात्र, आता ’फ्रॉनहोफर इन्स्टिट्यूट फॉर सेल थेरपी अँड इम्युनोलॉजी’च्या संशोधकांनी पायरियासारख्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी एक नवीन ‘स्मार्ट’ तंत्रज्ञान विकसित केले आहे.
काय आहे हे नवीन तंत्रज्ञान?
सध्या उपलब्ध असलेले माऊथवॉश किंवा टूथपेस्ट हे ’ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटिबायोटिक’सारखे काम करतात, ज्यामुळे तोंडातील नैसर्गिक सुरक्षा यंत्रणाही नष्ट होते. या नवीन संशोधनात वैज्ञानिकांनी ’प्रिसिजन मेडिसिन’चा वापर केला आहे. यात असे विशिष्ट रेणू आहेत, जे केवळ हिरड्यांमध्ये सूज आणि ऊतींचे नुकसान करणार्या हानिकारक एंझाईम्स आणि बॅक्टेरियांनाच लक्ष्य करतात.
पायरिया (पीरियोडोंटाइटिस) म्हणजे काय?
हा हिरड्यांचा एक गंभीर आजार आहे, जो दातांच्या बाजूला जमा होणार्या बॅक्टेरियांमुळे होतो. जेव्हा दातांवरील ’प्लाक’ कडक होऊन त्याचे रूपांतर ’टार्टर’मध्ये होते, तेव्हा हिरड्या आणि दातांच्या मध्ये मोकळी जागा (पॉकेटस्) तयार होते. या ठिकाणी संसर्ग वाढत जाऊन पायरिया होतो.
आजार होण्याची कारणे :
दातांवर प्लाक जमा होणे.
धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन.
मधुमेह, लठ्ठपणा आणि व्हिटॅमिन ‘सी’ ची कमतरता.
शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल.
प्रमुख लक्षणे :
ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येणे.
हिरड्यांचा रंग लाल किंवा जांभळा होणे.
हिरड्या दातांपासून विलग होणे.
तोंडातून सतत दुर्गंधी येणे.
दातांच्या मध्ये मोकळी जागा तयार होणे.
अन्न चघळताना वेदना होणे.