

सिडनी : उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी जर तुम्ही ‘एसी’ हाच एकमेव पर्याय समजत असाल, तर आता ही बातमी तुमच्यासाठी आहे. शास्त्रज्ञांनी असा एक ‘स्मार्ट पेंट’ (रंग) तयार केला आहे, जो घराला थंड ठेवून तुमची एसीची गरज पूर्ण करू शकेल. ‘युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी’च्या संशोधकांनी ‘ड्यूपॉइंट इनोवेशन्स’ नावाच्या स्टार्टअपसोबत मिळून हा अनोखा स्मार्ट पेंट तयार केला आहे. हा रंग केवळ घराचे तापमानच कमी करणार नाही, तर पाण्याच्या टंचाईवरही मात करण्यास मदत करेल. या पेंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा आपल्यावर पडणारे ९७ टक्के ऊन रिफ्लेक्ट म्हणजेच परत फेकून देतो. याशिवाय, विजेचा वापर न करता हवेतील आर्द्रता शोषून त्याचे पाण्यात रूपांतर करण्याची अफाट क्षमताही या रंगात आहे.
शास्त्रज्ञांनी हा रंग एका विशिष्ट पॉलिमरपासून तयार केला आहे, ज्यामध्ये अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात. यामुळे हा पेंट ‘पॅसिव्ह डे टाईम रेडिएटिव्ह कूलिंग’ तंत्रज्ञानावर काम करतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा रंग सूर्याची उष्णता स्वतःमध्ये शोषून घेण्याऐवजी ती थेट अंतराळात परत पाठवून देतो. चाचणीदरम्यान असे दिसून आले आहे की, हा पेंट लावल्यामुळे घराचे छत तब्बल २५ अंश सेल्सिअसपर्यंत आणि आजूबाजूची हवा ६ अंश सेल्सिअसपर्यंत अधिक थंड राहते. यामुळे घरात उष्णता शिरत नाही आणि एसीची गरजच उरत नाही. जर एसी वापरलाच, तर त्यावर पडणारा लोड खूप कमी होतो.
या पेंटची कमाल फक्त घर थंड ठेवण्यापुरती मर्यादित नाही. हा रंग कोणत्याही विजेच्या उपकरणाशिवाय हवेतील ओलावा शोषून पाण्याचे थेंब तयार करू शकतो. या पेंटचा पृष्ठभाग आजूबाजूच्या हवेपेक्षा जास्त थंड राहत असल्यामुळे, हवेतील आर्द्रता त्यावर येताच त्याचे रूपांतर पाण्याच्या थेंबांत होते. हिवाळ्यात सकाळी गवतावर जसे दवबिंदू जमा होतात, अगदी तसेच हे काम करते. शास्त्रज्ञांच्या मते, हा पेंट प्रति चौरस मीटर (वर्ग मीटर) क्षेत्रफळातून दररोज साधारण ३९० मिलीलीटर पाणी जमा करू शकतो. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या भागांसाठी हा रंग वरदान ठरू शकतो.
भारतासारख्या देशासाठी ठरू शकतो ‘गेमचेंजर’
भारतासारख्या देशात जिथे उन्हाळ्यात रेकॉर्डब्रेक तापमान वाढते आणि अनेक भागांत पाण्याचे भीषण संकट असते, तिथे हे तंत्रज्ञान गेमचेंजर ठरू शकते. घरे, कार्यालये आणि अगदी ग्रामीण भागातील घरांवरही याचा सहज वापर करता येईल. हा स्मार्ट पेंट सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या यावर कडक चाचण्या घेतल्या जात आहेत. हा रंग कोणत्याही सामान्य रंगाप्रमाणेच रोलर किंवा स्प्रेच्या मदतीने भिंतींवर आणि छतावर लावता येऊ शकेल. येत्या काळात हा शोध वाढत्या जागतिक तापमानाला तोंड देण्यासाठी एक मोठे अस्त्र ठरणार आहे.