Recyclable Fiber | शास्त्रज्ञांनी शोधला स्पँडेक्ससारखा ‘रिसायकल’ होणारा नवीन धागा

फॅशन विश्वातील प्लास्टिक प्रदूषणावर आता होणार मात
Recyclable Fiber |
Recyclable Fiber | शास्त्रज्ञांनी शोधला स्पँडेक्ससारखा ‘रिसायकल’ होणारा नवीन धागाOlivia Maule
Published on
Updated on

वॉशिंग्टन : तुमचे आवडते स्ट्रेचेबल (ताणले जाणारे) वर्कआऊट कपडे भविष्यात रिसायकल (पुनर्प्रक्रिया) करणे अत्यंत सोपे होणार आहे. शास्त्रज्ञांनी एका अशा नवीन लवचीक धाग्याचा शोध लावला आहे, जो सध्याच्या स्पँडेक्स (Spandex) फॅब्रिकइतकाच मजबूत आणि ताणला जाणारा आहे.

‘ACS मटेरियल्‍स लेटर्स’ या नियतकालिकात २५ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हा धागा पूर्णपणे ‘पॉलिथिलीन’पासून बनवण्यात आला आहे. पॉलिथिलीन हे तेच प्लास्टिक आहे ज्याचा वापर दुधाच्या पिशव्या, कॅन आणि किराणा सामानासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये केला जातो. सध्या बाजारात मिळणाऱ्या बहुतेक स्ट्रेचेबल कपड्यांमध्ये ‘स्पँडेक्स’ (जो लवचीक; पण कमकुवत असतो) या धाग्याला पॉलिस्टर किंवा नायलॉनसारख्या मजबूत धाग्यासोबत मिसळले जाते. यामुळे कपड्यांना लवचीकता आणि टिकाऊपणा तर मिळतो; परंतु हे धागे रासायनिकदृष्ट्या वेगवेगळे असल्याने रिसायकलिंगच्या वेळी त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे अत्यंत कठीण आणि महागडे असते.

हे कपडे विघटित करण्यासाठी वापरली जाणारी रसायने अत्यंत विषारी असतात. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या तब्बल ८० टक्के कपड्यांमध्ये स्पँडेक्स असते. रिसायकल होत नसल्याने हे बहुतांश कपडे कचऱ्यात फेकले जातात किंवा जाळले जातात, असे ‘एमआयटी’मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या संशोधक आणि सहलेखिका स्वेतलाना बोरिस्कीना यांनी सांगितले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘एमआयटी’च्या टीमने जगभरात सर्वात जास्त रिसायकल होणाऱ्या ‘पॉलिथिलीन’ प्लास्टिकचा आधार घेतला.

धाग्याच्या मध्यभागासाठी संशोधकांनी रबर बँडसारखी मऊ आणि स्प्रिंगसारखी पॉलिथिलीनची एक आवृत्ती तयार केली. या आतील भागाभोवती त्यांनी गळाला लावल्या जाणाऱ्या दोरीसारखा मजबूत पॉलिथिलीनचा दुसरा धागा स्प्रिंगसारखा किंवा फोनच्या वायरसारखा घट्ट गुंडाळला. दोन्ही भाग एकाच प्लास्टिकच्या प्रकारातून (पॉलिथिलीन) बनलेले असल्याने, रिसायकलिंग करताना त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्याची अजिबात गरज भासणार नाही. यामुळे फॅशन उद्योगातील प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news