Hantavirus vaccine | हंता व्हायरसवर प्रभावी लस विकसित करण्यात संशोधकांना यश

Hantavirus vaccine |
Hantavirus vaccine | हंता व्हायरसवर प्रभावी लस विकसित करण्यात संशोधकांना यश
Published on
Updated on

लंडन : एका जहाजावर उंदरांद्वारे पसरणार्‍या जीवघेण्या हंता व्हायरसचा उद्रेक झाल्याने 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका गटाने या विषाणूवर अत्यंत आशादायक आणि प्रभावी लस (व्हॅक्सीन) विकसित करण्यात मोठे यश मिळवले आहे. सध्या हंता व्हायरसवर कोणतीही विशिष्ट लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाहीत. हा संसर्ग गंभीर टप्प्यावर पोहोचल्यास तब्बल 40 टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

युनिव्हर्सिटी ऑफ बाथच्या शास्त्रज्ञांचे मोठे यश

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ बाथ येथील शास्त्रज्ञांनी हंता व्हायरस समूहातील हंतान आजाराविरुद्ध एक नवीन अँटीजेन विकसित केले आहे. या लसीची प्रयोगशाळेत आणि प्राण्यांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, याचे उत्कृष्ट परिणाम (इम्युन रिसपॉन्सेस) दिसून आले आहेत. प्राध्यापक असेल सार्तबाएवा यांच्या मते, ही लस प्रत्यक्ष वापरासाठी मंजूर होण्यापूर्वी अजून काही चाचण्यांमधून जाणे बाकी आहे.

जगात चिंतेचे वातावरण

एमव्ही हॉन्डियसया आलिशान जहाजावर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी हंता व्हायरसचा उद्रेक झाला. प्राथमिक अहवालानुसार, जहाजावर चढण्यापूर्वी काही प्रवासी पक्षी निरीक्षणासाठी एका कचरा डेपोजवळ गेले होते, तिथून त्यांना हा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे. या जहाजावर हंता व्हायरसचा अँडीज स्ट्रेन आढळला आहे, जो इतर स्ट्रेनच्या तुलनेत माणसांमधून माणसांमध्ये अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे हा संसर्ग जगभर पसरण्याची भीती निर्माण झाली असून यंत्रणा सध्या या जहाजावरून उतरलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेत आहे.

लक्षणे आणि दोन घातक मार्ग

हंता व्हायरसची लक्षणे शरीरात दिसण्यासाठी तब्बल 8 आठवड्यांचा काळ लागू शकतो. सुरुवातीला ही लक्षणे सामान्य फ्लू किंवा कोव्हिडसारखी वाटतात, त्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात. हा आजार प्रामुख्याने दोन प्रकारे शरीरावर हल्ला करतो. त्यामध्ये पहिला आहे, हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (एचपीएस). यामध्ये फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होते. गंभीर रुग्णांना मेकॅनिकल व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन थेरपी द्यावी लागते. यात मृत्यूचा दर 40 टक्के आहे. दुसरा आहे, हेमोरेजिक फिव्हर विथ रीनल सिंड्रोम (एचएफआरएस). हा प्रामुख्याने आशियाई स्ट्रेनमुळे होतो, ज्यामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव आणि किडनी निकामी होण्याचा धोका असतो. थर्मल स्टॅबिलायझेशन असलेल्या या लसी भविष्यात दुर्गम भागात किंवा उद्रेक झालेल्या ठिकाणी थेट ड्रोनद्वारे सहज पोहोचवता येतील, अशी आशा संशोधकांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news