Artificial blood clots | शास्त्रज्ञांनी बनवले कृत्रिम ‘ब्लड क्लॉटस्’

आता रक्तस्रावामुळे होणारे मृत्यू रोखणे शक्य
Artificial blood clots |
Artificial blood clots | शास्त्रज्ञांनी बनवले कृत्रिम ‘ब्लड क्लॉटस्’
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः अपघाताच्या प्रकरणांमध्ये अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शरीरातील रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. जखमेवर पट्टी बांधून किंवा दाब देऊनही अनेकदा रक्तस्राव थांबत नाही. मात्र, आता शास्त्रज्ञांनी यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. नेचर या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, वैज्ञानिकांनी असे कृत्रिम ‘ब्लड क्लॉटस्’ (रक्ताच्या गुठळ्या) तयार केले आहेत, जे जखमेच्या ठिकाणी लावताच रक्तस्राव त्वरित थांबवू शकतात.

नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक विशेष प्रकारचे सिंथेटिक मटेरियल तयार केले आहे. हे साहित्य आपल्या शरीरातील नैसर्गिक प्लेटलेटस्प्रमाणे (रक्तबिंबिका) काम करते. हे कृत्रिम कण शरीरात प्रवेश करताच रक्त गोठवणार्‍या पेशींशी जोडले जातात. हे कण इतके सूक्ष्म आहेत की ते केवळ जखम झालेल्या ठिकाणीच सक्रिय होतात आणि तिथे रक्ताला रोखण्यासाठी एक जाळे तयार करतात. नैसर्गिकरित्या शरीराला रक्त गोठवण्यासाठी थोडा वेळ लागतो; परंतु या नवीन तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया अत्यंत वेगवान होते.

प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, ज्या जखमांवर साध्या पट्ट्या किंवा औषधे काम करत नाहीत, तिथेही हे तंत्रज्ञान प्रभावी ठरते. अवघ्या काही सेकंदांत रक्तस्राव थांबवण्याची क्षमता यामध्ये असल्याने आणीबाणीच्या प्रसंगात हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. सध्या या तंत्रज्ञानावर अधिक संशोधन सुरू असून, मानवी वापरासाठी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केली जात आहे. जर सर्व चाचण्या यशस्वी झाल्या, तर येत्या काही वर्षांत हे तंत्रज्ञान प्रत्येक रुग्णवाहिका आणि फर्स्ट एड किटचा अविभाज्य भाग असेल. लाखो लोकांचे प्राण वाचवू शकणारी ही वैद्यकीय विज्ञानातील एक मोठी झेप मानली जात आहे.

नव्या तंत्रज्ञानाचे फायदे :

अपघातग्रस्तांना जीवदान : रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात नेताना होणारा रक्तस्राव थांबवणे आता सोपे होईल.

शस्त्रक्रियेत मदत : मोठ्या शस्त्रक्रियांदरम्यान जेव्हा अधिक रक्तस्राव होण्याचा धोका असतो, तेव्हा डॉक्टर याचा वापर करू शकतील.

रक्तविकारांवर उपचार : ज्यांच्या शरीरात रक्त नैसर्गिकरित्या गोठत नाही (उदा. हिमोफिलियाचे रुग्ण) त्यांच्यासाठी हा एक आशेचा किरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news