

न्यूयॉर्क ः संशोधकांनी नुकताच एक नवीन तांबे मिश्रधातू विकसित केला आहे, जो आजपर्यंत तयार करण्यात आलेल्या सर्वात टिकाऊ तांबे-आधारित पदार्थांपैकी एक मानला जात आहे. तांबे, टँटलम आणि लिथियम यांच्या संयोगाने तयार झालेला हा नवीन मिश्रधातू अतिशय लहान (नॅनो) पातळीवर तयार करण्यात आला आहे, जेणेकरून तो अत्यंत उच्च तापमान आणि ताण सहन करू शकेल. या शोधाचे निष्कर्ष 27 मार्च रोजी ‘सायन्स’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक पत्रिकेत प्रकाशित झाले आहेत.
‘ही एक अत्याधुनिक वैज्ञानिक प्रगती आहे, ज्यामध्ये तांब्याच्या उत्कृष्ट विद्युतवाहकतेसह निकेल-आधारित सुपरअलॉयसारखी मजबूत आणि टिकाऊ रचना एकत्र केली गेली आहे,’ असे या अभ्यासाचे सहलेखक आणि लेहाय युनिव्हर्सिटी, पेनसिल्व्हेनिया येथील अभियांत्रिकीचे एमेरिटस प्राध्यापक मार्टिन हार्मर यांनी सांगितले. सध्या, गॅस टर्बाइन इंजिन्स आणि रासायनिक प्रक्रिया उपकरणांसारख्या उच्च-ताण आणि उच्च-तापमानाच्या परिस्थितीमध्ये प्रामुख्याने निकेल-आधारित सुपरअलॉय वापरले जातात.
हे मिश्रधातू जरी मजबूत आणि गंजरोधक असले तरी, त्यांची विद्युतवाहकता कमी असल्यामुळे काही विशिष्ट क्षेत्रांत मर्यादा येतात. ही समस्या सोडवण्यासाठी, संशोधकांनी तांबे-लिथियम स्फटिक दोन टँटलम-समृद्ध थरांमध्ये सँडविच केल्याप्रमाणे बसवले. टँटलम हा एक अत्यंत गंजरोधक धातू आहे. त्यानंतर, संशोधकांनी लिथियमची अतिशय सूक्ष्म मात्रा मिसळून या स्फटिकांची रचना बदलली, ज्यामुळे ती अधिक स्थिर क्यूबॉइड (घनाकार) स्वरूपात आली आणि मिश्रधातूची मजबुती आणि उष्णता प्रतिकारक्षमता आणखी वाढली. हा नवीन मिश्रधातू अंतराळ, संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रासाठी क्रांतिकारी उपयोगी ठरू शकतो.