Type 1 Diabetes treatment | शास्त्रज्ञांकडून उंदरांमध्ये ‘टाईप 1’ मधुमेहावर यशस्वी उपचार

Type 1 Diabetes treatment |
Type 1 Diabetes treatment | शास्त्रज्ञांकडून उंदरांमध्ये ‘टाईप 1’ मधुमेहावर यशस्वी उपचार
Published on
Updated on

वॉशिंग्टन : वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवत शास्त्रज्ञांनी उंदरांवरील प्रयोगात ‘टाईप 1’ मधुमेहावर यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी दीर्घकालीन ‘इम्युनो सप्रेशन’ (रोगप्रतिकारकशक्ती दाबून ठेवणार्‍या औषधांची) गरज भासली नाही.

‘टाईप 1’ मधुमेहामध्ये शरीराची रोगप्रतिकारकशक्ती चुकून इन्सुलिन तयार करणार्‍या पेशींवरच हल्ला करते आणि त्या नष्ट करते. आतापर्यंत यावर उपाय म्हणून दात्याकडून मिळणार्‍या पेशींचे प्रत्यारोपण केले जात असे. मात्र, शरीर या नवीन पेशी स्वीकारण्यासाठी रुग्णाला आयुष्यभर अत्यंत कडक ‘इम्युनोसप्रेसंट’ औषधे घ्यावी लागत. या औषधांच्या दुष्परिणामांमुळे अशा प्रत्यारोपणाचा वापर मर्यादित होता. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात संशोधकांनी ‘कायमेरिक’ किंवा ‘मिश्र’ रोगप्रतिकार यंत्रणा विकसित केली आहे.

यामध्ये रुग्ण आणि दाता या दोघांच्याही रोगप्रतिकार यंत्रणेचे घटक एकत्र करण्यात आले. यामुळे उंदरांच्या शरीराने कोणत्याही दीर्घकालीन औषधांशिवाय इन्सुलिन तयार करणार्‍या नवीन पेशींचा स्वीकार केला. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ डॉ. जॉन डिपेर्सिओ यांच्या मते, ‘हा मधुमेहावर कायमस्वरूपी उपचार करण्याचा एक संभाव्य मार्ग आहे. सैद्धांतिकद़ृष्ट्या हे एक खूप मोठे पाऊल आहे.’ संशोधकांनी एकाच दात्याकडून मिळणार्‍या ‘अस्थिमज्जा स्टेम सेल्स’ आणि ‘आयलेट सेल्स’ यांचा वापर केला. या प्रक्रियेत स्टेम सेल्स शरीरात गेल्यावर पांढर्‍या पेशींची पुन्हा निर्मिती करतात.

ही नवीन विकसित झालेली रोगप्रतिकार यंत्रणा जुन्या दोषांना (इन्सुलिन पेशींवर हल्ला करणे) विसरते आणि नवीन प्रत्यारोपित केलेल्या पेशींना स्वतःचाच भाग म्हणून ओळखते. यामुळे शरीर त्या पेशींना नष्ट करत नाही. जरी उंदरांवरील हे प्रयोग यशस्वी झाले असले, तरी मानवावर उपचार करण्यापूर्वी अजून बराच काळ संशोधनाची गरज आहे. मिश्र रोगप्रतिकार यंत्रणेमध्ये संतुलन राखणे हे मोठे आव्हान आहे. परंतु, जर मानवी चाचण्यांमध्ये हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि टिकाऊ आढळले, तर हृदयविकार, किडनीचे आजार आणि डोळ्यांचे नुकसान करणार्‍या या जीवघेण्या मधुमेहावर कायमचा तोडगा निघू शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news