

लंडन : आतापर्यंत ‘हिप्पी’ किंवा ‘शांतीप्रिय’ म्हणून ओळखली जाणारी बोनोबो वानर प्रत्यक्षात ‘योद्धा’ समजल्या जाणाऱ्या चिम्पांझींइतकीच आक्रमक असल्याचे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे. मात्र, या दोन्ही प्रजातींमध्ये आक्रमकता दाखवण्याच्या पद्धतीत आणि लिंगाच्या आधारावर मोठा फरक दिसून आला आहे.
बेल्जियममधील ‘अँटवर्प झू सेंटर फॉर रिसर्च अँड कॉन्झर्व्हेशन’च्या संशोधक निकी स्टॅस यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पुढील महत्त्वाच्या बाबी आढळल्या : कोणाकडून आक्रमण? : बोनोबो प्रजातीमध्ये माद्या नरांवर अधिक हल्ला करतात. याउलट, चिम्पांझींमध्ये नर माद्यांवर अधिक आक्रमक होतात. मादी-मादी संघर्ष कमी : दोन्ही प्रजातींमध्ये माद्यांचे आपापसातील भांडण किंवा आक्रमकता अत्यंत कमी असल्याचे आढळले. बोनोबोची नवी ओळख : संशोधक निकी स्टॅस यांच्या मते, ‘बोनोबो पूर्वी वाटायचे तितके शांतताप्रिय नाहीत.’ अलीकडच्या काही घटनांमध्ये, काँगोमध्ये पाच रानटी मादी बोनोबोंनी एका नरावर हिंसक हल्ला केल्याचेही समोर आले आहे. मानवाच्या सर्वात जवळचे नातेवाईक मानल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रजाती सुमारे 15 ते 20 लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून वेगळ्या झाल्या. आफ्रिकेतील काँगो नदीमुळे या दोन प्रजाती भौगोलिकदृष्ट्या विभागल्या गेल्या आहेत. वानरवर्गामध्ये आक्रमकता हे एक महत्त्वाचे सामाजिक वर्तन आहे. स्वतःचा प्रदेश सुरक्षित ठेवणे, जोडीदार मिळवणे, वर्चस्व सिद्ध करणे आणि अन्नाचे स्रोत मिळवण्यासाठी ते आवाजाद्वारे किंवा शारीरिक हल्ल्यांद्वारे आपली आक्रमकता व्यक्त करतात.