

वॉशिंग्टन : स्पेस टेक्नॉलॉजीच्या जगातून एक अत्यंत थक्क करणारी आणि जगातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने एका अशा अनोख्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये थेट दिवस आणि रात्रीचे नैसर्गिक चक्र बदलण्याची ताकद आहे. अंतराळात एक अवाढव्य आरसा बसवण्याची तयारी सुरू असून, हा आरसा रात्रीच्या गडद अंधारातही पृथ्वीच्या एका मोठ्या भागावर सूर्यप्रकाश पसरवू शकेल. मात्र, या निर्णयामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे... मानवाच्या फायद्यासाठी निसर्गाशी केली जाणारी ही छेडछाड जगासाठी घातक ठरेल का?
अमेरिकेच्या ‘फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन' (FCC) या नियामक मंडळाने कॅलिफोर्नियातील ‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल’ या स्टार्टअप कंपनीला त्यांच्या पहिल्या चाचणी उपग्रहाच्या (इरेंडिल-१ / Earendel-1) प्रक्षेपणासाठी हिरवा कंदील दिला आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या निकटच्या कक्षेत पाठवला जाईल. अंतराळातून रात्रीच्या वेळी पृथ्वीवर सूर्यप्रकाश परावर्तित करणे (रिफ्लेक्ट करणे) हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे रात्रीच्या वेळीही सौर ऊर्जा प्रकल्पांना दिवसासारखा प्रकाश मिळू शकेल, असा दावा कंपनीने केला आहे.
‘रिफ्लेक्ट ऑर्बिटल'चा हा प्रायोगिक उपग्रह आकाराने एखाद्या लहान फ्रीजसारखा असेल. परंतु, अंतराळात साधारणपणे ४०० मैल (६४० किलोमीटर) उंचीवर पोहोचल्यानंतर, तो ६० फूट रुंद चौरस आकाराचा आरसा उघडेल. हा आरसा सूर्यप्रकाश अशा प्रकारे वळवेल (रिफ्लेक्ट करेल) की पृथ्वीवरील विशिष्ट ५ किलोमीटरच्या परिघात दिवसासारखा प्रकाश पडेल. कंपनीच्या मते, यामुळे सूर्यास्तानंतरही सोलर पॅनल्सद्वारे वीज निर्मिती करता येईल. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव मोहीम राबवणे, रात्रीच्या वेळी बांधकाम करणे किंवा रस्त्यांवर उजेड पाडणे सोपे होईल. कंपनीचे उद्दिष्ट २०२८ पर्यंत असे १,००० आणि २०३५ पर्यंत सुमारे ५०,००० उपग्रह अंतराळात पाठवण्याचे आहे. भविष्यातील हे आरसे साधारणपणे १८० फूट रुंद असतील आणि ते तब्बल १०० पौर्णिमेच्या चंद्रांइतका प्रकाश देतील. या प्रकल्पामुळे जागतिक वैज्ञानिक समुदायामध्ये प्रचंड संताप आणि चिंता पसरली आहे.
‘अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी'ने FCC ला पत्र लिहून हा प्रकल्प जनहिताचा नसल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, अंतराळातील या अत्यंत चमकदार आरशांमुळे संवेदनशील दुर्बिणींच्या कामात अडथळा निर्माण होईल. यामुळे अंतराळातील अंधूक ग्रह किंवा तारे पाहणे अशक्य होऊन बसेल. रात्रीच्या वेळी कृत्रिम सूर्यप्रकाश मिळाल्याने मनुष्य, प्राणी आणि वनस्पतींचे जैविक घड्याळ बिघडेल. त्यांच्या झोपण्याच्या, जागे होण्याच्या आणि स्थलांतराच्या नैसर्गिक पद्धतीवर याचा अत्यंत वाईट परिणाम होईल. आकाशात अचानक निर्माण होणाऱ्या तीव्र प्रकाशामुळे विमानाचे पायलट आणि रस्त्यावरील चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडण्याचा धोका वाढेल. या वादावर उत्तर देताना FCC ने स्पष्ट केले आहे की, त्यांचे काम केवळ उपग्रह दळणवळण आणि रेडिओ फ्रिक्वेन्सीचे नियमन करणे आहे, पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची तपासणी करणे नाही. अमेरिकन नियमांनुसार, बाह्य अंतराळातील उपक्रमांसाठी कोणत्याही पर्यावरणीय पुनरावलोकनाची आवश्यकता नसते.