

नवी दिल्ली : जिराफ म्हटलं की, डोळ्यांसमोर उभी राहते ती त्याची उंचच उंच मान; पण त्याच्या मानेइतकेच लक्षवेधी आहेत ते त्याच्या अंगावरचे सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिपके. अनेकदा आपल्याला वाटतं की, हे ठिपके केवळ त्याच्या सौंदर्यात भर घालतात; पण नुकत्याच झालेल्या संशोधनातून एक अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. हे ठिपके केवळ एक डिझाईन नसून, जिराफाच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची दुहेरी भूमिका बजावणारी एक नैसर्गिक प्रणाली आहे.
जिराफाच्या ठिपक्यांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, छद्मावरण, म्हणजेच सभोवतालच्या परिसरात मिसळून जाण्याची क्षमता. आफ्रिकेच्या जंगलात आणि सवाना प्रदेशात जिराफाचे अनियमित ठिपके त्याच्या शरीराची बाह्यरेखा पुसट करतात. विशेषतः, जेव्हा सूर्यप्रकाश झाडा-झुडपांमधून खाली येतो, तेव्हा हे ठिपके आणि सावल्या यांचा एक असा खेळ तयार होतो की, प्रचंड आकाराचा असूनही जिराफ सहज नजरेस पडत नाही.
संशोधक मिचेल यांच्या मते, ‘जिराफ ज्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रदेशात राहतात, त्यांच्या ठिपक्यांची रचना त्या परिसराशी मिळतीजुळती असते.’ उदाहरणार्थ, बाभळीच्या झाडांच्या फांद्यांच्या रचनेत आणि जिराफाच्या ठिपक्यांच्या आकारात अनेकदा साम्य आढळते. हे छद्मावरण जिराफाच्या पिल्लांसाठी तर अक्षरशः वरदान ठरते. 2018 साली झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या पिल्लांच्या अंगावरील ठिपके मोठे आणि अधिक गोलाकार होते, त्यांच्या जगण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसून आले. याचाच अर्थ, अधिक प्रभावी छद्मावरण शिकार्यांपासून त्यांचे संरक्षण करते. विशेष म्हणजे, आई आणि पिल्लांच्या ठिपक्यांमध्ये बरेच साम्य असते, यावरून हे वैशिष्ट्य आनुवंशिक असल्याचेही सिद्ध होते.
या ठिपक्यांचे दुसरे आणि तितकेच महत्त्वाचे काम म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करणे. जिराफ आफ्रिकेच्या रणरणत्या उन्हात राहतात, जिथे तापमान प्रचंड असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना माणसांप्रमाणे घाम येत नाही किंवा कुत्र्याप्रमाणे ते धापा टाकून शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकत नाहीत. मग ते स्वतःला थंड कसे ठेवतात? याचे उत्तर त्यांच्या ठिपक्यांमध्येच दडलेले आहे. प्रत्येक गडद ठिपक्याच्या खाली रक्तवाहिन्यांचे एक अत्यंत दाट जाळे असते. जेव्हा जिराफाच्या शरीरात उष्णता वाढते, तेव्हा या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि उष्ण रक्त या ठिपक्यांकडे पाठवले जाते. ठिपक्यांखालील रक्त त्वचेच्या पृष्ठभागाजवळ आल्याने त्यातील उष्णता सहजपणे वातावरणात फेकली जाते. थर्मल कॅमेर्याने काढलेल्या छायाचित्रांमध्येही हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, उष्ण वातावरणात जिराफाचे गडद ठिपके सभोवतालच्या फिकट त्वचेपेक्षा जास्त उष्ण असतात, जे या तापमान नियंत्रण प्रणालीला दुजोरा देते.