

रियाध : आज संपूर्ण जगासमोर पिण्याच्या शुद्ध पाण्याची कमतरता एक गंभीर संकट म्हणून उभी आहे; पण सौदी अरेबियाने या आव्हानाला आपल्या सामर्थ्यात बदलले आहे. या वाळवंटी देशात नैसर्गिकरीत्या नद्या नाहीत, तलाव नाहीत आणि भरपूर पाऊसही पडत नाही. तरीही, हा देश समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करून (desalination) या समस्येवर जगात नेतृत्व करत आहे. सौदी अरेबिया आधुनिक तंत्रज्ञान आणि विशाल डी-सॅलिनेशन प्रणालीच्या मदतीने दररोज नवीन विक्रम स्थापित करत आहे. अनेक देश जे वर्षभरात साध्य करू शकत नाहीत, ते सौदी अरेबिया दररोज साध्य करत आहे. पाण्याचे तीव्र दुर्भिक्ष्य असूनही, सौदी अरेबिया आज जागतिक स्तरावर सर्वात मोठा गोडे पाणी उत्पादक देश बनला आहे.
त्यांची अत्याधुनिक डी-सॅलिनेशन प्लांटस् 24 तास कार्यरत राहून समुद्राच्या खार्या पाण्याला पिण्यायोग्य बनवतात. एका अंदाजानुसार, जगाच्या एकूण डी-सॅलिनेशन क्षमतेपैकी सुमारे 20 टक्के हिस्सा एकटा सौदी अरेबिया संचालित करतो. ही उपलब्धी अनेक विकसित देशांच्या पाणी उत्पादन क्षमतेपेक्षाही जास्त आहे. सौदी अरेबिया दररोज सुमारे 70 लाख क्यूबिक मीटर शुद्ध पाणी तयार करतो. हे पाणी अनेक आशियाई आणि आफ्रिकन देशांच्या वर्षभराच्या क्षमतेपेक्षाही जास्त आहे. या देशात केवळ 100 ते 200 मि.मी. पाऊस आणि 50 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असतानाही, अत्याधुनिक आरओ (RO-Reverse Osmosis) आणि थर्मल डी-सॅलिनेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने या नैसर्गिक आव्हानांवर मात केली आहे. आरओ मेम्ब्रेन तंत्रज्ञान आणि विशाल थर्मल प्लांटस् मिळून दररोज अब्जावधी लिटर समुद्राच्या खार्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करत आहेत.
सौदी अरेबिया केवळ पाणी तयार करत नाही, तर ते पाणी दूरवरच्या शहरांपर्यंत पोहोचवण्याचे कामही करतो. हा देश जगातील सर्वात मोठी पाईपलाईन प्रणाली चालवतो. इथली राजधानी रियाध समुद्रापासून शेकडो किलोमीटर दूर असूनही, येथील लोकांना सतत गोडे पाणी मिळते. उंच भागांपर्यंत पाणी पंप करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते आणि अनेक ठिकाणी घरांच्या टाक्यांपर्यंत टँकर्सद्वारे पाणी पोहोचवले जाते. ही संपूर्ण प्रणाली जगातील सर्वात जटिल आणि विशाल पाणी नेटवर्कपैकी एक मानली जाते. डी-सॅलिनेशन तंत्रात खूप ऊर्जा खर्च होते, त्यामुळे येथे तयार झालेले गोडे पाणी पेट्रोलपेक्षाही महाग पडते. तथापि, सरकार मोठी सबसिडी देऊन ते सामान्य लोकांसाठी स्वस्त दरात उपलब्ध करते. याच कारणामुळे, सौदी अरेबियामध्ये पाणी केवळ एक सुविधा नसून, ते एक हाय-टेक संसाधन आहे, ज्याच्या निर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात.