

बीजिंग ः रशिया आणि चीनने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा ऐतिहासिक करार केला असून, हा प्रकल्प 2036 पर्यंत पूर्ण होणार आहे. या अणुभट्टीतून आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन स्थानकाला (International Lunar Research Station – ILRS) वीज पुरवली जाणार आहे. हे स्थानक रशिया आणि चीन यांच्या नेतृत्वाखाली विकसित होत आहे.
या कराराची अधिकृत घोषणा दोन्ही देशांनी नुकतीच केली. या पार्श्वभूमीवरच अमेरिकेच्या ‘नासा’ने 2026 साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांच्या चंद्राच्या कक्षेत उभारण्यात येणार्या बेस स्टेशन प्रकल्पावर खर्च कमी करण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर रशिया-चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अधिकच लक्षवेधी ठरतो. रॉसकॉसमॉसचे महासंचालक युरी बोरिसोव यांनी 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ही अणुभट्टी मानवांशिवाय स्वयंचलित तंत्रज्ञानाद्वारे उभारली जाईल. अद्याप संपूर्ण तांत्रिक तपशील स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी ‘सर्व आवश्यक तांत्रिक टप्पे जवळजवळ पूर्ण झाले आहेत,’ असे बोरिसोव यांनी नमूद केले.
रॉसकॉसमॉसने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे दीर्घकालीन मानवविरहित चंद्रावरील संशोधन शक्य होईल आणि भविष्यात मानवी उपस्थितीसाठी ते आधारभूत ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध—ुवावर उभारण्यात येणार्या या कायमस्वरूपी संशोधन स्थानकात आतापर्यंत 17 देशांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये इजिप्त, पाकिस्तान, व्हेनेझुएला, थायलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. चीनच्या चांग ‘ई-8’ ( Chang e-8) मोहिमेद्वारे 2028 मध्ये या स्थानकाचे प्राथमिक बांधकाम सुरू होईल. हे चीनचे पहिले मानवयुक्त चंद्रावरचे लँडिंग असेल. ILRS साठीची रूपरेषा जून 2021 मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, 2030 ते 2035 दरम्यान पाच सुपर हेवी रॉकेटच्या माध्यमातून या स्थानकाचे विविध भाग चंद्रावर पाठवले जातील. पुढे चीन त्यात आणखी विस्तार करणार असून, चंद्राच्या कक्षेत असलेल्या स्पेस स्टेशनशी ते जोडले जाईल.
याशिवाय चंद्राच्या विषुववृत्ताजवळ आणि दूरच्या बाजूला आणखी दोन ‘नोडस्’ तयार करण्यात येणार आहेत. 2024 मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत चीनच्या डीप एक्सप्लोरेशन प्रोजेक्टचे प्रमुख डिझायनर वू यानहुआ यांनी सांगितले की, या विस्तारित प्रकल्पाचे उद्दिष्ट मंगळावरील मानवी मोहिमांसाठी पायाभरणी करणे आहे. हा प्रकल्प 2050 पर्यंत पूर्ण होईल, अशी योजना आहे. या स्थानकासाठी सौरऊर्जा, रेडिओ आईसोटोप जनरेटर आणि अणुऊर्जेचा वापर केला जाईल. तसेच चंद्र आणि पृथ्वी यांच्यात जलद संवाद साधण्यासाठी हाय-स्पीड नेटवर्क, चंद्रावरील वेगवान वाहने आणि मानवसह/ मानवविरहित रोव्हरचा समावेश असणार आहे.