

लंडन : कृत्रिम फुटबॉल मैदाने आणि खेळाच्या मैदानांवर वापरल्या जाणार्या ‘रबर क्रंब’मुळे मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले असल्याचा धक्कादायक दावा एका विशेष अहवालात करण्यात आला आहे. ‘डेली मेल’ या वृत्तपत्राचे वरिष्ठ प्रतिनिधी डम लक यांनी हा अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यात पालक आणि तज्ज्ञांनी मुलांना या मैदानांवर खेळू न देण्याचे आवाहन केले आहे.
‘रबर क्रंब’ हे जुन्या टायरपासून तयार केलेले लहान कण आहेत, जे कृत्रिम फुटबॉल मैदानांमध्ये हिरव्या प्लास्टिकच्या ‘गवता’च्या ब्लेड्समध्ये भरले जातात. हे कण मैदानांना लवचिकता देतात. मात्र, यात ‘पीएएफएस’ सारखी घातक रसायने असू शकतात, ज्यांना ‘कायमची रसायने’ (फॉरएव्हर केमिकल्स) म्हणूनही ओळखले जाते.
कॅन्सरचा वाढता धोका : 1990 च्या दशकापासून लहान मुलांमध्ये लिंफोमा आणि इतर रक्ताच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘चिल्ड्रन विथ कॅन्सर यूके’ या संस्थेनुसार, 15 वर्षांखालील मुलांमध्ये लिंफोमा 39.7 टक्क्यांनी वाढला आहे.
गोल्डकीपरमध्ये धोका जास्त: अमेरिकेतील एका फुटबॉल प्रशिक्षक एमी ग्रिफिन यांनी केलेल्या अभ्यासानुसार, गोलरक्षक खेळाडू आणि कर्करोगाचा संबंध असल्याचे समोर आले. गोलरक्षकांना मैदानावर खाली पडावे लागते, ज्यामुळे रबर क्रंबचे कण त्यांच्या शरीरावर लागतात, डोळ्यांत जातात आणि कधीकधी गिळलेही जातात.
मेंदूच्या पेशींवर परिणाम : हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, ‘मायक्रोप्लास्टिक’ मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतात. काही संशोधकांनी या कणांमुळे डीएनएला नुकसान पोहोचू शकते, असा इशारा दिला आहे, जो कर्करोगाचा प्रोसेसर (वाहक)आहे.
हवेतील प्रदूषण : कृत्रिम मैदानांवरील रबर क्रंबमुळे हवेत विषारी कण मिसळतात. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे शरीरात हानिकारक रसायने जातात.
तापमानाचा परिणाम: उच्च तापमानात ही मैदाने अधिक धोकादायक ठरतात. कारण, उष्णतेमुळे रबर क्रंबमधून बेंझीन सारखी विषारी रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
युरोपियन युनियनने 2023 मध्ये 2031 पर्यंत रबर क्रंबच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ब्रिटनमध्ये अद्याप असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ‘फिफा’ आणि ‘स्पोर्ट इंग्लंड’ सारख्या संस्था अजूनही युरोपियन केमिकल्स एजन्सीच्या 2017 च्या अहवालाचा हवाला देत आहेत, ज्यात गंभीर आरोग्याच्या धोक्यांचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्याच अहवालात खेळाडूंना हात धुण्याचा आणि कपडे बाहेर काढण्याचा सल्ला दिला होता. या अहवालावर टीका करणार्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रबर क्रंबच्या सुरक्षिततेवर पुरेसे संशोधन झालेले नाही. एका गोलकीपरचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी, आपण मुलांना अशा गोष्टींवर खेळू देऊ नये, असे सांगितले आहे. सध्या यावर कोणताही स्पष्ट निष्कर्ष नसला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक तज्ज्ञ या मैदानांचा वापर टाळण्याचा सल्ला देत आहेत.