

गोंडा : उत्तर भारतात होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा होतो व त्यावेळी जे गोडधोड बनवले जाते, त्यामध्ये ‘गुझिया’ या पदार्थाचा समावेश आहे. आपल्या करंजीप्रमाणे गोड सारण भरून केलेल्या या पदार्थाचे होळीच्या सणावेळी वेगळेच महत्व असते. यामधील सारणही प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे बनवले जाते. या गुझियाही हल्ली हलवायांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अत्यंत महागड्याही मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील श्री गौरी स्वीटस्मध्ये सोन्याच्या वर्खाची शाही गुझिया तब्बल 1500 रुपयांना एक अशा किमतीस मिळत आहे! चांदीचा वर्ख लावलेल्या गुझियाही इथे आहेत.
पारंपरिक खवा आणि सुक्या मेव्याने भरलेली गुझिया चविष्ट असण्याबरोबरच संस्कृतीशी जोडलेली आहे. गोंडामधील श्री गौरी स्वीटस् यांनी या वर्षीच्या होळीच्या सेलिब—ेशनला शाही स्पर्श दिला आहे. येथे 15 हून अधिक प्रकारच्या गुझियांची व्हरायटी उपलब्ध आहे आणि सर्वाधिक चर्चा होत आहे सोने व चांदीच्या वर्खाने सजलेल्या गुझियांची! 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाने मढवलेली गुझिया केवळ महागडीच नाही, तर तिचा स्वाद आणि अनुभवही राजेशाही आहे. या गुझियामध्ये उत्तम दर्जाचा खवा, केशर, काजू, पिस्ता, बदाम आणि विदेशी मेवे घालण्यात आले आहेत, ज्यामुळे तिची चव आणि पौष्टिकता अधिक वाढली आहे. भारतात सोन्याचा वर्ख हा शाही मिठाई आणि पदार्थांमध्ये प्राचीन काळापासून वापरला जातो. राजघराण्यांमध्ये आणि उच्चभ्रू लोकांमध्ये याला विशेष स्थान होते. म्हणूनच, श्री गौरी स्वीटस्मध्ये लोकांची मोठी गर्दी या सोन्याच्या गुझिया पाहण्यासाठी होत आहे. एक गुझियाची किंमत तब्बल 1500 रुपये असून, ती अत्यंत आकर्षक आणि राजेशाही पॅकेजिंगमध्ये मिळते. सोन्याबरोबरच, येथे चांदीच्या वर्खाने सजवलेली गुझिया सुद्धा उपलब्ध आहे. भारतीय गोड पदार्थांमध्ये चांदीच्या वर्खाचा वापर सौंदर्यवर्धन आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे केला जातो.